पिंपरी : सामाजिक कार्याची संधी आणि ११२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ५९ वर्षीय व्यक्तीची दोन कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना जुलै ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत मोशी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घडली. याप्रकरणी एका ५९ वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी अजय राजाराम खडके (कोल्हापूर) आणि ॲड. सोमनाथ कदम (निगडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना सामाजिक कार्याची संधी देऊ असे सांगितले. एका आरोपीच्या ११२ कोटी रुपयांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणारे व्याज वापरण्यास मिळेल असे सांगितले. यासाठी लागणाऱ्या ३ कोटी रुपयांपैकी दोन कोटी ६० लाख रुपये बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडले. आरोपींनी फिर्यादीसोबत बनावट करारनामा, बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बनावट डिमांड ड्राफ्टचा वापर करून फसवणूक केली. त्यांनी फिर्यादीचे दोन ६५ लाख रुपये परत न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
पेट्रोल पंपावर सिगारेट पिण्यावरून दोघांना मारहाण
वाकड येथे एका पेट्रोल पंपावर सिगारेट पिण्यावरून झालेल्या वादातून तीन तरुणांनी पेट्रोल पंपावरील दोघांना चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना ताथवडे येथे घडली. याप्रकरणी स्वप्निल बाळासाहेब नवले (३८, ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सौरभ ज्ञानेश्वर खंडाळकर (२५, वाकड) याला पोलिसांनी अटक केली आहे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादींचा चुलत भाऊ पेट्रोल पंपावर गप्पा मारत असताना, दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांना पेट्रोल पंपाजवळ सिगारेट पिण्यास नकार दिल्याने वाद झाला. याचा राग आल्याने दुचाकी चालकाने पेट्रोल भरणाऱ्या कामगाराला जोरदार धडक दिली. फिर्यादी आणि त्यांचे सहकारी मदतीसाठी गेले असता, आरोपींनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि चाकूने वार केले. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले. वाकड पोलीस तपास करत आहेत.
चांगल्या परताव्याच्या आमिषाने १६ लाखांची फसवणूक
चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून एका ५१ वर्षीय व्यक्तीची १५ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना १७ ते ३१ जुलै या कालावधीत बावधन येथे घडली. याप्रकरणी एका ५१ वर्षीय व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवले आणि त्यांची १५ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करत आहेत.
जुन्या भांडणातून हॉकी स्टीक आणि लाकडी पट्टीने मारहाण
पिंपळे गुरव येथे जुन्या भांडणातून दोघांनी एका तरुणाला लाकडी पट्टी आणि हॉकी स्टीकने मारहाण केली. ही घटना सोवमारी (८ सप्टेंबर) घडली. याबाबत ३८ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून लाकडी पट्टीने मारहाण केली. हॉकी स्टीकने फिर्यादीच्या डोक्यावर, हातांवर, पायांवर आणि मानेवर मारून त्यांना गंभीर जखमी केले. जीवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
चिखली येथे वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात सोमवारी (८ सप्टेंबर) रात्री कुदळवाडी सर्कल, चिखली येथे घडला. रेवंताराम बाबाराम देवासी (३२) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संतोषदेवी रेवंताराम देवासी (२९) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शंकर बाबाराम देवासी (३०, पुनावळे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ रेवंताराम आणि त्याची पत्नी संतोषदेवी हे त्यांच्या दुचाकीवरून पुनावळे येथे जात असताना, वाहनावरील चालकाने भरधाव वेगाने, निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात रेवंताराम यांच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या पत्नीच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात न नेता वाहन चालक पळून गेला. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या रेवंताराम यांचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करत आहेत.
घरगुती गॅसची बेकायदेशीर विक्री
भोसरी येथील एका दुकानात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून धोकादायक पद्धतीने गॅस काढून छोट्या सिलेंडरमध्ये भरून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात होती. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत एका व्यक्तीला अटक केली. विजय धर्मराज संकुडे (३२, चऱ्होली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई किरण जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने, कोणतीही सुरक्षा न बाळगता, घरगुती वापराच्या गॅसचा व्यवसाय करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून अवैध गॅसचा साठा, गॅस ट्रान्सफर करण्याचे साहित्य आणि एक टेम्पो असा एकूण ५ लाख ८१ हजार ६०० रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.