पिंपरी : शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून आतापर्यंत ५७ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर, चिकनगुनिया आजाराचे सात रुग्ण आहेत. झिकाचे दोन्ही रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जूनपासून डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दोन महिन्यांमध्ये शहरात ५७ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. वाढत्या डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने डेंग्यूमुक्त मोहीम सुरू करण्यात आली. समाजमाध्यमे, शहरातील मॉल, सिनेमागृहाद्वारे डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका या आजारांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आठवड्यातून एक दिवस घर आणि परिसराची साफसफाई करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, त्याचा प्रभाव दिसून येत नसून दिवसें-दिवस डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

हेही वाचा : लोकसभेच्या निवडणुकीअगोदर आमच्याकडे कोणी बघतही नव्हते, आता…; जयंत पाटील यांची फटकेबाजी

झिका रुग्ण आढळलेल्या पिंपळेगुरव आणि निगडी परिसरात वैद्यकीय विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत १३ हजार ५४४ घरांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये २६ संशयितांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. २३ गर्भवती महिलांचेही नमुने घेतले आहेत. त्यांपैकी काहींचे तपासणी पूर्ण झाली असून त्यांचा अहवाल नकारात्मक आले आहेत.

२४ लाखांचा दंड वसूल

कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यावसायिक आस्थापना, गृहनिर्माण सोसायट्यांसह घरांची तपासणी करण्यात येत आहे. डासोत्पत्ती ठिकाणे आढळल्यामुळे दंडात्मक कारवाई केली जात आहे. एक जूनपासून २४ लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केल्याचे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांनी सांगितले.

हेही वाचा : लोणावळा: मद्यधुंद पर्यटक २०० फुट उंच डोंगरावरून पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर उतरला! मित्रांसोबत झाला होता किरकोळ वाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण आहेत. रुग्णांची प्रकृती गंभीर होत नाही. अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. घरातील भांड्यात पाणी साचू देऊ नये, आठवड्यातून एकदा साफसफाई करावी. लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले.