पिंपरी – चिंचवड : पोलिसांनी वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा दंड करून बेशिस्त वाहन चालक सुधारत नसल्याने आता थेट त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांकरिता रद्द (सस्पेंड) करण्यात येणार आहे. अशा बेशिस्त ६०० वाहन चालकांची यादी आरटीओ अधिकारी यांच्याकडे देण्यात आली असून त्यापैकी २०० वाहन चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांकरिता रद्द करण्यात आले आहे. अशी माहिती वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांनी लोकसत्ता ऑनलाईनला दिली आहे.
मद्यपान करून दुचाकी चालवणे, विना हेल्मेट दुचाकी चालवणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे असे सर्रास प्रकार घडतात. वाहन चालकांना दंडही केला जातो. परंतु, बेशिस्त वाहन चालक हे काही सुधारत नसल्याने आता थेट त्यांचा वाहन परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांकरिता रद्द करण्यात येणार आहे. अशाच ६०० जणांचं ड्रायव्हिंग लायसन तीन महिन्यांकरिता रद्द करण्यात यावा याबाबत आरटीओ यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आला आहे.
हेही वाचा : पिंपरी : महापालिकेतील शिपाई आता हवालदार, जमादार होणार
त्यापैकी २०० वाहनचालकांचं लायसन्स तीन महिन्यांकरिता रद्द करण्यात आलं आहे. यामुळे बेशिस्त वाहन चालकांवर आळा बसण्यास काही प्रमाणात नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर अपघाताचे प्रमाणदेखील कमी होईल, अशी अपेक्षा वाहतूक पोलिसांना आहे. अनेकदा वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकाला अडवल्यास त्यांच्यासोबत वाहन चालक अरेरावी करतो. हुज्जत घालतो. तेव्हा, पोलीस आणि वाहन चालकाचा वेळ वाया जातो. त्यामुळे थेट लायसन रद्दची कारवाई केल्याने तरी वाहन चालक सुधारतील अशी अपेक्षा आहे.
वाहतूक पोलिसांची अशीच कठोर कारवाई सुरू राहील. बेशिस्त वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे अन्यथा ही कारवाई अटळ आहे, असा इशारा वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांनी वाहन चालकांना दिला आहे.