पुणे : महापालिकेच्या शहरातील सर्व नाट्यगृहांमध्ये प्रत्येक प्रयोगानंतर स्वच्छता करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी महापालिका पूर्णवेळ ठेकेदाराची नेमणूक करण्याचा विचार करीत असून, स्वच्छतेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, अशी महिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.
कोथरूड येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एका महिलेला उंदरामुळे त्रास झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर नाट्य कलाकार, प्रेक्षक यांच्यासह पुणेकरांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने नाट्यगृहांमध्ये पेस्ट कंट्रोलची कामे करण्यास सुरुवात केली आहे. आता सर्व नाट्यगृहांतील प्रत्येक प्रयोगानंतर तेथे स्वच्छता केली जाणार आहे. या कामासाठी स्वतंत्र ठेकेदार नेमण्याचा विचार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी दिली.
या प्रकारानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नाट्यगृहाची पाहणी केली होती. त्यानंतर शहरातील पालिकेच्या सर्वच नाट्यगृहांची दुरवस्था झाल्याचे समोर आले होते. महापालिका प्रशासन नाट्यगृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी दर वर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते, बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहांमधील वातानुकुलित यंत्रणा दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, असे असतानाही पुरेशा सुविधा पुरविल्या जात नसल्याने कलाकारांसह नागरिकांमध्ये नाराजी आहे.
नाट्यगृहात प्रयोग पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. उंदीर पकडण्यासाठी जाळे देखील लावण्यात आले आहे. तसेच नाट्यगृहांची स्वच्छता केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महापालिकेच्या नाट्यगृहातील सोयीसुविधांचा आढावा घेतला जात आहे. नाट्यगृहात खाद्यपदार्थ नेण्यात येऊ नये, यासाठी काळजी घेतली जाणार आहे. नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर नाट्यगृहांची स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. – ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका