पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी पीएमपीने कॅशलेस तिकीट सेवा सुरू केली असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सेवेला रविवारपासून प्रारंभ झाला. युपीआय क्यू-आर कोड स्कॅन करून प्रवाशांना तिकीट घेता येणार आहे. कॅशलेस सुविधा सुरू करण्यात आली असली तरी जुनी तिकीट प्रणाली कायम ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, एकाच तिकीट यंत्रणेमध्ये प्रवाशांना पीएमपी आणि मेट्रोमध्येही प्रवास करता यावा, यासाठी पीएमपीने मेट्रोसोबत यंत्रणा जोडावी, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीएमपी प्रशासनाला केली. कॅशलेस तिकीट सेवा सुरू करण्यात आल्याने सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांत होणारे वाद थांबणार आहेत.

हेही वाचा – पिंपरी : चार वर्षांपासून महात्मा गांधी स्मारकाची प्रतीक्षाच

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून पीएमपीकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने कॅशलेस तिकीट सेवा सुरू करण्याची घोषणा पीएमपीचे अध्यक्ष डाॅ. सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केली होती. या सेवेची बाणेर आगारात प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यात आली. त्यानंतर रविवारपासून पीएमपीच्या कार्यक्षेत्रात या सेवेला प्रारंभ झाला.

सचिन्द्र प्रताप सिंह, सहव्यस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार, माजी नगरसेवक गणेश वरपे, नवनाथ जाधव, अजय मारणे, किरण दगडे-पाटील, अल्पना वरपे, दिलीप वेडे-पाटील, संदीप बुटाला यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा – पुणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशाला लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवाशांना तिकिटासाठी क्यू-आर कोडद्वारे तिकीट काढता येणार आहे. वाहकाच्या ई-तिकीट मशीनमध्ये तिकीट रकमेचा क्यू आर कोड स्कॅन करून युपीआयद्वारे पैसे भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. कॅशलेस पेमेंट सुविधेमुळे ज्या जुन्या सुविधा चालू आहेत त्यावर कोणताही परिणाम होणार नाही.