पिंपरी : ‘एकत्रित आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना अंगीकृत रुग्णालयाच्या सेवेत १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल. रुग्णांवर उपचार केल्यानंतर दावे मागणीबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास त्याच महिन्यात दाव्याची रक्कम अदा करण्यात येईल,’ अशी ग्वाही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी दिली. तसेच, १०८ क्रमांकाच्या २५० रुग्णवाहिका लवकरच नागरिकांच्या सेवेकरिता उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात राज्य आरोग्य हमी सोसायटी सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाळासाहेब ठाकरे-जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कार सोहळा आणि अंगिकृत रुग्णालय संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद जगताप, पोपटराव पवार उपस्थित होते.

आबिटकर म्हणाले, ‘राज्य शासनाच्या वतीने १०८ क्रमांकाच्या २५० रुग्णवाहिका लवकरच नागरिकांच्या सेवेकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिका शासकीय रुग्णालयाबरोबरच योजनेशी संलग्न रुग्णालयांकरिता उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आयुष्यमान भारत कार्ड काढणाऱ्या आशा कार्यकर्त्या, स्वस्त धान्य दुकान चालक आदींना पाच रुपयांऐवजी ३० रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल. यामुळे आयुष्यमान कार्ड गतीने काढण्याबरोबरच प्रत्येक नागरिक रुग्णालयांशी संलग्न होईल.

महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत मिळणाऱ्या रकमेतून ८० टक्के रक्कम रुग्णालयाकरिता आणि २० टक्के रक्कम राज्य आरोग्य हमी सोसायटी राखीव निधीकरिता राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या माध्यमातून पाच लाख रुपयांपुढील शस्त्रक्रियेकरिता रुग्णालयांनी उपयोग करावा.’

‘राज्य शासनाच्या वतीने रुग्णालयाला विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयांनीदेखील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवांचा लाभ देण्याचे काम करावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याचा तयारी ठेवावी, त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व पायाभूत आरोग्य सुविधा उभारण्यावर भर द्यावा. उत्कृष्ट काम करणाऱ्या रुग्णालयांच्या कामाची दखल घेऊन इतर रुग्णालयांनीदेखील त्याच पद्धतीने काम करावे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या रुग्णालयाच्या पाठीमागे राज्य शासन भक्कमपणे उभे राहील,’ असेही ते म्हणाले.

२४७३ रुग्णालयांचा समावेश

एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये दोन हजार ४७३ रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहेत.