पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात पर्यावरण आणि नदीसंवर्धनाच्या कामकाजासाठी महापालिकेच्या वतीने तृतीयपंथीयांचा समावेश असलेल्या नदी सुरक्षा पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत महापालिकेच्या वतीने विविध कृतीशील उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या तृतीयपंथी समूहाचे सामाजिक आणि आर्थिक समावेशन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

शहरात अनेक ठिकाणी पवना आणि इंद्रायणी नदी तसंच नाल्यांच्या काठावर तसेच रस्त्याच्या कडेने खासगी जागेत जागा मालकांद्वारे अनधिकृतपणे भराव टाकले जात आहेत. तसेच काही ठिकाणी मोकळ्या जागेत देखील भराव टाकल्याचे आढळले आहे. या कृतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच अशा गोष्टींना आळा घालणे व दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आगामी स्वातंत्र्यदिनी आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते “नदी सुरक्षा पथकाच्या” कार्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या पथकाच्या तीन तुकड्या निर्माण करण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांना सामावून घेऊन त्यांचे सबलीकरण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने व अनेकविध उपक्रम राबविले जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेने तृतीयपंथी पुनर्वसन कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत महापालिकेने तृतीयपंथीयांचा महापालिकेच्या सुरक्षा रक्षक, ग्रीन मार्शल पथकामध्ये समावेश केला आहे. तसेच आरोग्य, उद्यान विभागातील विविध कामकाजासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शोचालयांचे संचालन करण्यासाठी तृतीयपंथीयांच्या बचत गटांना प्राधान्य देण्यात आले आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत शहरात वास्तव्य असलेल्या आणि ५० वर्ष पूर्ण झालेल्या  तृतीयपंथीयांसाठी काही अटी व शर्थींच्या अधीन राहून दरमहा पेन्शन योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या बचत गटांना बळ देण्यासाठी अर्थसहाय्य योजना सुरु करण्यात आली आहे.