पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील मिळून २१ विधानसभा मतदारसंघातील ८८ हजार ७२४ दुबार मतदारांना जिल्हा निवडणूक शाखेकडून वगळण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाने याबाबत सूचना दिल्या आहेत.
गेल्या वर्षापासून १० ऑगस्ट २०२२ अखेरपर्यंत एकूण चार लाख सहा हजार ५८९ छायाचित्र नसलेले मतदार आहेत. त्यापैकी तीन लाख ९४ हजार ७२५ छायाचित्र नसलेल्या मतदारांबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार गेल्या दोन वर्षात जिल्ह्याने चांगली कामगिरी केली असून गेल्या वर्षी जिल्ह्यातून नवीन नावनोंदणी, पत्ताबदल, नाव वगळणी याबाबत एकूण १३ लाख सहा हजार ७१ अर्जावर अंतिम निर्णय घेण्यात आले आहेत. यंदा १० ऑगस्टपर्यंत आठ लाख १४ हजार ३४२ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी सात लाख २८ हजार १२८ अर्जावर कार्यवाही पूर्ण झालेली आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.




दरम्यान, जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघामध्ये मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्र गोळा करुन त्यांचे छायाचित्र अद्ययावत करणे, किंवा मयत झालेल्या, दुबार असलेल्या व स्थलांतरित झालेल्या मतदारांची वगळणी करण्याचे कामकाज तसेच, दुबार नोंदी असलेल्या मतदारांची पडताळणी करुन त्यांची वगळणी करण्याचे कामकाज करण्यात सुरू आहे. छायाचित्र मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात छायाचित्र न जमा केलेल्या मतदारांनी त्यांचे छायाचित्र तात्काळ जमा करावीत. तसेच, मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या किंवा ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती मयत झालेली असलेल्या मतदारांनी अर्ज क्र. सात https://nvsp.in या संकेतस्थळावरुन किंवा ‘वोटर हेल्पलाईन’या मोबाईल उपयोजनद्वारे भरावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.
आधार मतदारयादीला जोडण्याचे आवाहन
भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार मतदार यादीतील तपशीलाशी आधार जोडण्याकरीता अर्ज क्र. सहा-ब http://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा ‘वोटर हेल्पलाईन’ उपयोजनद्वारे डाऊनलोड करुन भरता येणार आहे. ही जोडणी पूर्णपणे ऐच्छिक असून जिल्ह्यातील मतदारांनी आपला आधार क्रमांक मतदार यादीच्या तपशीलाशी जोडावा, असे आवाहन आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.