पुणे : विमानतळ प्रवासी सुविधांमध्ये नापास ठरले आहे. विमानतळ सेवा गुणवत्ता निर्देशांकात पुणे विमानतळ ७२ व्या स्थानी घसरले आहे. विमानतळावरील प्रवासी संख्या वाढत असताना प्रवासी सुविधा वाढत नसल्याचे चित्र आहे. सुविधा अपुऱ्या पडू लागल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलच्या वतीने सर्वेक्षण करून विमानतळ सेवा गुणवत्ता (एएसक्यू) निर्देशांक जाहीर केला जातो. जगभरातील ९५ देशांतील ४०० विमानतळांचे सर्वेक्षण यासाठी केले जाते. यात देशातील १५ मोठ्या विमानतळांचा समावेश आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीतील सर्वेक्षणाच्या आधारे पुणे विमानतळ या निर्देशांकात ७२ व्या स्थानी घसरले आहे. त्याआधीच्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत पुणे विमानतळ ७० व्या स्थानी होते. त्यामुळे प्रवासी सुविधांचा दर्जा घसरल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : पिंपरी : छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पुतळ्यांच्या जागेत बदल; पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोट्यवधींचा भुर्दंड?

सेवा गुणवत्ता निर्देशांकात विमानतळांवरील ३१ महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला जातो. त्यात प्रवेशद्वाराजवळ बसण्यासाठी आसने, प्रवाशांना सहजपणे त्यांचा मार्ग सापडणे, विमानांच्या उड्डाणाची माहिती व्यवस्थित मिळणे, विमानतळ ते टर्मिनल अंतर कमी असणे, विमानतळ कर्मचाऱ्यांची सौजन्यशीलता, वाय-फाय सेवा गुणवत्ता, चार्जिंग स्थानकांची उपलब्धता, मनोरंजन अथवा विश्रामासाठी पर्याय, स्वच्छतागृहे, आरोग्यासंबंधी सुरक्षिततेची काळजी, स्वच्छता आणि वातावरण या इतर गोष्टींचा समावेश आहे. पुणे विमानतळाचे स्थान ३१ पैकी १७ सेवांमध्ये घसरले आहे.

प्रवासी वाढता वाढता वाढे…

प्रवासी संख्येच्या बाबतीत पुणे विमानतळ देशात नवव्या स्थानी आहे. मागील वर्षी पुणे विमानतळावरील प्रवाशांची संख्या ९४.५९ लाखांवर पोहोचली. ही संख्या २०२२ मध्ये ६९.२६ लाख होती. त्यात मागील वर्षी तब्बल ३७ टक्के वाढ झाली आहे.

हेही वाचा : राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाची प्रतीक्षा

पुणे विमानतळाची सध्याची वार्षिक प्रवासी क्षमता ७१ लाख आहे. नवीन टर्मिनलची वार्षिक क्षमता १ कोटी २० लाख आहे. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर एकत्रित प्रवासी क्षमता १ कोटी ९१ लाखांवर पोहोचणार आहे. नवीन टर्मिनल ५ लाख चौरस फुटांचे असून, त्याचे काम पूर्ण झालेले आहे. या टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असल्याने त्याला विलंब होत आहे.