‘गीतरामायण’ अयोध्या नगरीत निनादणार

अयोध्येमध्ये गीतरामायण सादर करण्याचा प्रयोग प्रथमच होत आहे.

geet ramayan
अयोध्येमध्ये गीतरामायण सादर करण्याचा प्रयोग प्रथमच होत आहे.

पुण्यातील कलाकारांचा सहभाग

महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर व ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या आणि गेली सहा दशके मराठी मनावर रुंजी घालणाऱ्या ‘गीतरामायणा’चे सूर शरयू तीरावर असलेल्या अयोध्या नगरीमध्ये निनादणार आहेत. ज्या भूमीमध्ये प्रत्यक्ष रामायण घडले तेथे जाऊन १० एप्रिल रोजी गीतरामायणील हिंदूी गीते सादर करण्यात येणार असून त्यामध्ये पुण्यातील कलाकारांचा सहभाग आहे. अयोध्येमध्ये गीतरामायण सादर करण्याचा प्रयोग प्रथमच होत आहे.

‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुश-लव रामायण गाती’ हे गीतरामायणातील पहिले गीत आकाशवाणी पुणे केंद्रावरून १ एप्रिल १९५५ रोजी प्रसारित झाले होते. त्याला ६२ वर्षे पूर्ण होत आहेत. हे औचित्य साधून भारत विकास परिषद आणि विश्व हिंदूू परिषद यांनी हा योग जुळवून आणला आहे. भारत विकास परिषदेतर्फे बुधवारी (२९ मार्च) गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता गीतरामायणातील मराठी गीते सादर केली जाणार असून अभिनेते राहुल सोलापूरकर या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. विश्व हिंदूू परिषद आणि श्रीहरी सत्संग समितीतर्फे १० एप्रिल रोजी कारपूरम येथे सायंकाळी सहा वाजता गीतरामायणातील हिंदूी गीते सादर केली जाणार आहेत. दत्ता चितळे, तुषार रिठे, प्रार्थना साठे, राधिका इंगळहळ्ळीकर आणि भक्ती दातार या गायक कलाकारांचा सहभाग असून त्यांना दीप्ती कुलकर्णी (संवादिनी), चारुशीला गोसावी (व्हायोलिन), अनय गाडगीळ (सिंथेसायझर), अमित कुंटे (तबला) आणि उद्धव कुंभार (तालवाद्य) हे साथसंगत करणार आहेत.

गीतरामायण मराठीमध्ये लोकप्रिय असले तरी हिंदूी, आसामी, तमीळ, तेलुगू, हिंदूी, उडिया, गुजराथी आणि इंग्रजी अशा भाषांमध्ये गीतरामायणाचा अनुवाद झाला आहे. वसंत आजगावकर यांनी यापूर्वी हिंदूी गीतरामायण गायनाचे कार्यक्रम केले आहेत. पण, अयोध्येमध्ये अशा स्वरूपाचा कार्यक्रम प्रथमच होत असल्याचा आनंद वाटतो, असे गदिमांचे पुत्र आनंद माडगूळकर यांनी सांगितले. गदिमांच्या गीतरामायणाचा रुद्रदत्त मिश्र आणि जळगाव येथील अशोक जोशी ऊर्फ कुमुदाग्रज यांनी हिंदूीमध्ये अनुवाद केला आहे. या दोन्ही गीतरामायणातील गीते आम्ही सादर करणार आहोत. अनुवाद करताना सुधीर फडके यांनी केलेली स्वररचना तशीच राहील अशाच पद्धतीने काव्यरचना करण्यात आलेली आहे. त्यामुळे मराठी भाषेतील गीतरामायणाच्या चालीमध्येच हिंदूी गीते सादर केली जाणार आहेत, अशी माहिती दत्ता चितळे यांनी दिली. भारत विकास परिषदेतर्फे गेली १५ वर्षे रामनवमीच्या काळात गीतरामायणाचा कार्यक्रम सादर केला जात आहे. यंदा अयोध्येला कार्यक्रम करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune artists to perform geet ramayan show in ayodhya

ताज्या बातम्या