पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ३८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत एकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महंमदवाडी भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. सुरुवातीला तक्रारदारांनी चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने काही रक्कम पाठविली. चोरट्यांनी त्यांना परतावा दिल्याने विश्वास बसला.

त्यानंतर चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. त्यांनी वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात ३८ लाख १० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस मानसिंग पाटील तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी सायबर चोरट्यांच्या बतावणीवर विश्वास ठेवू नये, तसेच संदेशांकडे कानाडोळा करावा,’ असे आवाहन पोलिसांनी केले आहे.