बारामती : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामतीतील मुख्य शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचा आणि त्या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखाान्याच्या निवडणुकीच्या मतदार याद्या आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांच्यासह पोलीस आणि महसूल प्रशासनाची चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी येत्या रविवारी (२२ जून) मतदान होत आहे. बुधवारी (१८ जून) रोजी रात्री जिल्हा बँकेची बारामतीतील मुख्य शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे निदर्शनास आले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे या दोघांशी संबंधित व्यक्ति त्यावेळी बँकेत उपस्थित होत्या. तसेच तेथे माळेगावच्या मतदार याद्या आणि अन्य साहित्य आढळून आल्याचा आरोप सहकार बचाव पॅनेलचे रंजन तावरे यांनी केला.
या प्रकरणी बँकेचे सहायक शाखा व्यवस्थापक संजय जगदाळे म्हणाले, ‘बँक सायंकाळी साडेपाच वाजता बंद होते. बँक सुरू असल्याचे समजल्यावर रात्री बँकेत आलो. मी आणि रंजन तावरे एकाचवेळी तेथे पोहोचलो. बँकेच्या वरील मजल्यावर संगणकीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथे लोक बराच वेळ उपस्थित असतात. माळेगावच्या याद्या कशा सापडल्या, हे सांगता येणार नाही.
निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने म्हणाले, रात्री अकरा वाजता बँक सुरू का होती, याचा खुलासा मागितला आहे. याशिवाय सहायक निबंधक, पोलीस निरीक्षक, मंडल अधिकारी यांची समिती नेमण्यात आली आहे. समितीच्या अहवालावर पुढील बाबी ठरतील. तावरे यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे.’
उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड म्हणाले, ‘आचारसंहितेच्या पथकाला न्यायदंडाधिकाऱ्यांचे अधिकार असतात. संबंधित घटनेची सखोल चौकशी करून ते अहवाल सादर करतील. त्यानुसार काही चुकीचे घडले असेल तर पुढील कायदेशीर कारवाई होईल.’
‘एसआयटी’कडून चौकशी करा- खासदार सुळे
माळेगाव साखर कारखान्याचे मतदान दोन दिवसांवर आले असताना बारामतीतील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा रात्री उशिरापर्यंत उघडी कशी असू शकते, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. बँकेला याचे उत्तर द्यावे लागेल. या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.