पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. जुलै महिन्यात सरासरी भरून काढलेल्या पावसाची त्यापेक्षा अधिकची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेले पाण्याचे टँकर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जुलैअखेरीस जिल्हा अखेर टँकरमुक्त झाला आहे.

-१२ दिवस दमदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले –

यंदा उन्हाळ्यात जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील वाड्यांवर पहिला टँकर सुरू करण्यात आला. त्यानंतर कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली होती. कडक उन्हामुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन, पाणीचोरी व गळती आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे बाधित नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. याशिवाय यंदा पूर्वमोसमी पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली. तसेच मोसमी पाऊस वेळेत सक्रिय होऊनही संपूर्ण जून महिन्यात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील टँकरची संख्या ६० च्यापुढे गेली होती. ४ जुलैपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली. त्यानंतर सलग ११-१२ दिवस दमदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. त्यामुळे टप्प्याटप्प्याने टँकरची संख्या कमी होत गेली.

… त्यामुळे टँकरची गरज नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले –

दरम्यान, जुलै महिन्यातही जिल्ह्यातील आंबेगाव, भोर, हवेली, जुन्नर, खेड आणि पुरंदर तालुक्यांमधील काही गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. गेल्या आठवड्यात २२ जुलैपर्यंत आंबेगाव आणि शिरूर तालुक्यात मिळून पाच टँकर सुरू होते. २८ जुलै रोजी जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील ३२० लोकसंख्येच्या एका गावात एक शासकीय टँकर सुरू होता. २० जुलै रोजी हा टँकरही बंद करण्यात आला आहे. या गावासाठी एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामुळे टँकरची गरज नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.