पुणे : बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारपासून (२४ जून) तीन दिवसीय महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात सायंकाळी चार वाजता केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते लीला गांधी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
महोत्सवाच्या कालावधीत संगीत नाटक विभाग, गद्य नाटक विभाग तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना बालगंधर्व गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या महोत्सवाला उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार, खासदार डाॅ. अमोल कोल्हे आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवातील ठळक कार्यक्रम
- मंगळवार (२४ जून) – व्यावसायिक नाटकांवर चर्चासत्र, सहभाग – विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दामले
- बुधवार (२५ जून) – ‘स्त्री आज कितपत सुरक्षित’ या विविषयावर चर्चासत्र, सहभाग – अंजली दमानिया, दीपाली सय्यद, रूपाली चाकणकर, तृप्ती देसाई
- गुरुवार (२६ जून) – कलाकारांसमवेत गप्पा, सहभाग – प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव