पिरंगुट औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका रासायनिक कंपनीत सोमवारी दुपारी भीषण आग लागून १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेतील मरण पावलेल्यांचे मृतदेह ओळख पटविण्यात आल्यानंतर आता नातेवाईककडे सुपूर्द केले जाणार आहेत. मात्र, नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. नातेवाईकांनी चार मागण्या केल्या असून, त्या पूर्ण न झाल्यास मृतदेह न स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, मृतांचे नातेवाईक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत.

मुळशी तालुक्यातील उरवडे- पिरंगुट औद्योगिक वसाहतीत एसव्हीएस अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजी ही कंपनी आहे. या कंपनीत जंतुनाशकांची निर्मिती केली जाते. सोमवारी दुपारी कंपनीत अचानक आग लागली. या भंयकर आगीत १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले. मृतदेह होरपळे असल्यानं त्यांची ओळख पटविण्यात आली असून, दुसरीकडे मृतांच्या नातेवाईकांनी पार्थिव ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे.

Pune MIDC Fire : मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर

रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेनं मृतांच्या नातेवाईकांच्या वतीने आता पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन दिलं आहे. एसव्हीएस अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये मालकाच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा मृत्यू झाला. एसव्हीएस अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजी कंपनीकडून मृतांच्या कुटुंबीयांना मोबदला देण्यात यावा, असं म्हणत चार मागण्या केल्या आहेत. प्रत्येक मृत व्यक्तीच्या वारसांना २५ लाख रुपये द्यावेत, मुलांच्या शिक्षणाची आजीवन जबाबदारी स्वीकारावी, प्रत्येक मृत व्यक्तीच्या घरातील एका व्यक्तीस कायमस्वरूप नोकरी देण्यात यावी, तसेच नियमांचं उल्लंघन करून कंपनीला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांना या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावं, अशा मागण्या नातेवाईकांनी केल्या आहेत.

Pune MIDC Fire : आगीचं क्रौर्य! ‘त्या ’ १८ जणांची ओळखही पटेना

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. तसेच करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर नातेवाईक आणि संघटना आमरण उपोषणाला बसू, असा इशाराही देण्यात आला आहे. नातेवाईक या मागण्यांसंदर्भात आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांची भेट घेणार आहेत.