पुणे : ‘शहरातील गरजू रुग्णांना कमी दरात कर्करोगाची तपासणी करता यावी, यासाठी ‘पेट स्कॅन’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर ‘पेट स्कॅन व रेडिओ डायग्नोस्टिक प्रकल्प’ कार्यान्वित करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. पुढील काही महिन्यांतच हा प्रकल्प सुरु होईल,’ असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
पुणे महापालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयांत सध्या ‘पेट स्कॅन’ची सुविधा नाही. त्यामुळे गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. खासगी रुग्णालयांचे दर परवडणारे नसल्याने अनेक रुग्णांना योग्य उपचार मिळणे कठीण होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कमी दरात ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वारगेट येथील हिराबाग आरोग्य कोठी शेजारी सुरू असलेल्या वसंतदादा पाटील प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये प्रकल्प उभारला जाणार आहे. महापालिका आयुक्त राम यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात पाहणी केली. आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यावेळी उपस्थित होते.
या प्रकल्पामध्ये पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री लॅब, एमआरआय, सीटी स्कॅन यांसह अत्याधुनिक निदान तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. स्वतःच्या आरोग्य यंत्रणेतून पेट स्कॅन व रेडिओ डायग्नोस्टिक प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध करून देणारी पुणे महापालिका देशातील पहिली महापालिका ठरणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
सहायक आरोग्य अधिकारी डॉ संजीव वावरे म्हणाले, कर्करोगाची तपासणी कमी दरात करता यावी यासाठी महापालिकेने हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कमी दरात गरीब आणि गरजू रुग्णांना ‘पेट स्कॅन’ करता येणार आहे. हा प्रकल्प पुढील महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न महापालिकेचा आहे. यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळू शकणार आहेत.
या सुविधेचा सर्वांत मोठा फायदा गरीब व गरजू रुग्णांना होणार असून, त्यांना केंद्र सरकारची आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) दरात ही सेवा मिळेल. त्यामुळे कर्करोग निदानासाठी होणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला असून, कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे डॉ. वावरे यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजाराची योग्यवेळी तपासणी होणे आवश्यक आहे. या तपासणीसाठी लागणारा खर्च परवडत नसल्याने गरीब आणि गरजू रुग्ण याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने हे पाऊल उचलले असून स्वतःच्या आरोग्य यंत्रणेतून पेट स्कॅन व रेडिओ डायग्नोस्टिक प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध करून देणारी पुणे महापालिका देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.
