पुणे : हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ दिल्याने महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष दक्ष झाला आहे. धरणातून नदीत पाणी सोडल्यास हे पाणी नागरी वस्तीमध्ये घुसू नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यलयांमध्ये प्रत्येकी दोन पथके नेमण्यात आली आहे. पावसामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याच्या किरकोळ तक्रारी आपत्ती निवारण कक्षाकडे आल्या. त्याची दखल घेत त्या सर्व सोडविण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी सांगितले.

हवामान विभागासह सी-डॅक यांनी शहरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पथके नेमण्यात आली आहे. मल:निस्सारण विभागातील अधिकाऱ्यांसह क्षेत्रीय कार्यालय पातळीवरील पथकांचा यामध्ये समावेश आहे.

शहरात ‘रेड अलर्ट’ देण्यात आल्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सोमवारी सकाळी आपती व्यवस्थापन कक्षातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून सूचना दिल्या.

‘हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ दिला असला तरी सोमवारी झालेला पाऊस हा घाटमाथ्यावर पडत आहे. शहरात सकाळपासून संततधार आहे. त्यामुळे बाणेर, शंकरशेठ रस्ता, येरवडा येथील गुंजन टॉकीज यासह काही भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याच्या किरकोळ तक्रारी महापालिकेकडे आल्या. या तक्रारींची दखल घेत तातडीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात पाहणी करुन तुंबलेल्या पाण्याला वाट करुन दिली. घाटमाथा परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि धरणातून विसर्ग करण्यास सुरुवात झाल्यास त्याचा कोणताही परिणाम नागरिकांवर होऊ नये, यासाठी जलसंपदा विभागासह पोलीस खात्याच्या संपर्कात असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनुने यांनी सांगितले.

पावसाचे पाणी नागरी भागात शिरु नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात असून आपत्ती व्यवस्थापनसाठी पुरेशा साहित्य देखील महापालिकेने तैनात केलेल्या बचाव पथकांना देण्यात आले आहे. महापालिकेचे अधिकारी देखील पथकांवर लक्ष ठेवत असल्याचे सोनुने यांनी स्पष्ट केले.