पुणे प्रतिनिधी : पुणे रेल्वे स्टेशन हा परिसर सतत वर्दळीचा मानला जातो. या ठिकाणी शेकडो रेल्वेची ये जा आणि हजारो प्रवाशांनी सतत गजबज असते. याच पुणे रेल्वे स्टेशन येथे गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास २९ वर्षीय राजावती कोल ही महिला पती, बहीण आणि मुलीसोबत गावी जाण्यास निघाली होती. त्यावेळी अचानक राजावती यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या, याबाबतची माहिती प्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वेच्या कर्मचार्यानी आरपीएफ महिला हेड कॉन्स्टेबल शिल्पा उकाडे यांना दिली.
सदर घटनेची माहिती मिळताच, शिल्पा उकाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वेदना होणार्या महिलेला धीर दिला, आणि त्या महिलेची प्रसूती केली. महिलेने मुलीला जन्म दिला असून आरपीएफ महिला हेड कॉन्स्टेबल शिल्पा उकाडे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले जात आहे.
सदर घटनेबाबत आरपीएफ च्या महिला हेड कॉन्स्टेबल शिल्पा उकाडे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या,गुरुवारी माझी नाईट ड्युटी होती आणि त्यावेळी सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात काम करीत होते. मला एक मेसेज आला की, प्लॅटफॉर्म क्रमांक एक येथे महिलेला खूप प्रसूती वेदना होत आहे. त्या ठिकाणी पोहोचवून मदत करा, मी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्या दरम्यान आमच्या टीमकडून महिलेच्या वेदनेबाबत डॉक्टरांनाही माहिती देण्यात आली होती. काही वेळात घटनास्थळी पोहोचत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मी तेवढ्यात घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी त्या महिलेला प्रचंड प्रसूती च्या वेदना होत होत्या. आपण काय करावे हे मला काही सुचत नव्हते. त्यावेळी आमच्या एका महिला सफाई कर्मचारी यांना मदतीसाठी बोलावून घेतले आणि प्लॅटफॉर्म पार्सल एकत्रित जमा होतात, तेथील आडोशाला महिलेला घेऊन गेलो आणि पुढील काही वेळात त्या महिलेची प्रसूती झाली. महिलेने मुलीला जन्माला दिला. त्यानंतर डॉक्टरांची टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आई आणि बाळाला पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सातव्या महिन्यात डिलिव्हरी झाल्याने बाळाची तब्येत नाजूक होती. पण आता बाळाची तब्येत ठीक असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या,मी देखील एक महिला असून एका महिलेच्या मदतीला धावून गेले आणि त्या महिलेची मदत करू शकले. याबाबत मला एक वेगळेच समाधान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.