स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे पोलीस आयुक्तालयाकडून रविवारी धावण्याची स्पर्धा (दौड)आयोजित करण्यात आली. शारिरिक तंदुरुस्ती तसेच मानासिक स्वास्थासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पोलिसांसह नागरिक सहभागी झाले होते.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सकाळी साडेसहाच्या सुमारास स्पर्धेचा प्रारंभ झाला. नेमबाज अंजली भागवत, दौडचे आयोजक ब्ल्यू ब्रिगेड या आरोग्यविषयक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे संचालक अजय देसाई, बजाज फिनसर्व्हचे कृश इराणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, राजेंद्र डहाळे, रामनाथ पोकळे उपस्थित होते. जुगल राठी, मधुमिता, अविनाश कुमार आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप पांडुळे यांनी धावपटू म्हणून सहभाग घेतला. या दौडमध्ये पुणे पोलीस आयुक्तालयातील; तसेच पुणे शहरातील इतर पोलीस विभागातील सहाशे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

या वेळी पोलिसांच्या बँड पथकाने वादन सादर केले. पूनम जैन यांनी झुम्बा नृत्यप्रकार सादर करुन स्पर्धकांचा उत्साह वाढविला. पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहायक पोलिस आयुक्त पौर्णिमा तावरे, पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, दशरथ हाटकर, पोलिस कल्याण संघ आणि ब्लू ब्रिगेड यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन रेडिओ जॉकी तरुण यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला गटात सहायक पोलीस निरीक्षक वैष्णवी जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. व्दितीय क्रमांक शीला जाधव आणि तृतीय क्रमांक रूपाली दळवी आणि वैशाली हरगुडे यांनी पटकाविला. पुरुष गटात रोहित जाधव यांनी पहिला क्रमांक पटाकाविला. सतीश लांडगे यांनी द्वितीय आणि राहुल चौहान यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. शिवछत्रपती पुरस्कार विजेते सहायक पोलिस निरीक्षक सुजाता शानमे, उपनिरीक्षक गुंगा जगताप, रेश्मा पाटील, प्रसाद मोकाशी, संतोष घाडगे यांचा सत्कार करण्यात आला.