पुणे : स्वारगेट येथील छत्रपती शाहू महाराज बस स्थानकाची दुर्दशा झाल्याने अत्याधुनिक सुविधायुक्त स्थानक बांधण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) राज्य सरकारला पाठविला आहे. मात्र, पाच महिन्यांनंतरही हा प्रस्ताव अद्याप मंजुरीसाठी प्रलंबित आहे.

या स्थानकात महिलेवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर या स्थानकातील सुरक्षा व्यवस्था आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न चर्चेत आला होता. त्यानंतर स्थानकाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या पुणे विभागाने तयार करून मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे.

राज्यातील एसटी महामंडळाच्या स्थानकांपैकी सर्वांत मोठे आठ एकर जागेत स्वारगेटचे छत्रपती शाहू महाराज बस स्थानक आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे स्थानक असल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील गावांसह दक्षिण भारतातील विविध राज्यांतील १६० मार्गांवर एसटीची सेवा आहे. या स्थानकावरून तीन हजारांहून अधिक बसची ये-जा सुरू असते. दिवसभरात ६५ हजार ते ७० हजार प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. या स्थानकात तीन फलाट, बस दुरुस्ती केंद्र, सुरक्षा रक्षक चौकी, वाहनतळ, प्रतीक्षा कक्ष, कार्यालयीन कक्ष आदी इमारती आहेत.

सध्या स्थानकाची दुर्दशा झाली असून, इमारती जुन्या असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. स्थानकाच्या आवारात खड्डे पडून पावसाळ्यात तेथे सातत्याने पाणी साचते. फलाटांवर गर्दी झाल्यास आसन क्षमताही कमी पडते. त्यामुळे पुनर्विकास गरजेचा आहे.

स्वारगेट येथील बस स्थानकाच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी मिळताच अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त स्थानक बांधण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल.- अरुण सिया,विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे आहे स्वारगेट बस स्थानक

एकूण क्षेत्रफळ : आठ एकर
बसची संख्या : १६०
दररोज ये-जा करणाऱ्या बसची संख्या : ३,०००
दैनंदिन प्रवासी संख्या : ६५ हजार ते ७० हजार