दीर्घ विश्रांतीनंतर राज्याच्या बहुतांश भागात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने राज्याच्या बहुतांश भागात पुढील काही दिवस जोरधारा कोसळतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण-गोवा, घाटमाथा विभागात मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
जुलैमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंत जोरदार बरसलेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या सर्वच भागातून गायब झाला होता. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढला होता. मात्र, सध्या मोसमी पावसाला सक्रिय होण्यासाठी पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुसार पुढील आठवडाभर राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. रत्नागिरी, कणकवली, देवगड, लांजा, सावंतवाडी, चिपणूळ, पोलादपूर, गगनबावडा, राधानगरी, महाबळेश्वर, आजरा, पन्हाळा, कोल्हापूर, सातारा या कोकण गोवा आणि मध् यमहाराष्ट्रातील ठिकाणी गेल्या चोवीस तासांत पाऊस झाल्याची नोंद भारतीय हवामान विभागाकडे करण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी चोवीस तासांत जोरदार पाऊस झाला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. या कालावधीत मुंबई, ठाणे परिसरातही जोरदार सरींचा अंदाज आहे.पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा आदी भागांतही प्रामुख्याने घाट विभागांमध्ये मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आदी जिल्ह्यांत पुढील दोन दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. कोकण-गोवा, मध्यमहाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
द्रोणीय स्थिती पावसाला अनुकूल
मोसमी पावसाची आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सरासरी जागेपासून उत्तरेकडे हिमालयाच्या पायथ्याशी सरकल्याने महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली होती. मात्र, ही आस पुन्हा मूळ जागेवर येत आहे. साहजिकच राज्यामध्ये पुन्हा पाऊस सक्रिय होत आहे. मोसमी पावसाची ही प्रणाली केरळ किनारपट्टीपर्यंत सरकली असून दक्षिण महाराष्ट्र ते उत्र केरळ किनारपट्टीलगत द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती पावससाठी अनुकूल असल्याने पुढील काही दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे.