लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : घरफोडीचे शंभरपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेला चोरटा राजेश राम पपूल याच्यासह साथीदाराला हडपसर पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याकडून चोरलेले दागिने विकत घेणाऱ्या सराफ व्यावसायिकाला अटक करण्यात आली.

याप्रकरणी चोरटा राजेश राम पपूल उर्फ चोर राजा (वय ४०, रा. दुगड चाळ, कात्रज), साथीदार प्रदीप उर्फ गणेश बाळासाहेब गाडे (वय ३५, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता), तसेच सराफ व्यावसायिक कुणाल रुपेश वाफगांवकर (वय २३, रा. सिंहगड रस्ता) यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश चोर राजा या टोपणनावाने ओळखला जातो. त्याच्याविरुद्ध घरफोडीचे ४० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार प्रदीप याच्याविरुद्ध घरफोडीचे पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपी राजेश आणि प्रदीप यांनी घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने रांजणगाव, कात्रज, हडपसर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते.

हडपसर पोलिसांनी सापळा लावून दुचाकीस्वार राजेश आणि साथीदार प्रदीप यांना पकडले. तपासात दोघांनी हडपसर भागात आठ ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. त्यांनी चाेरलेले दागिन्यांची विक्री सराफ व्यावसायिक कुणाल वाफगावकर याला विक्री केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने वाफगावरकर याला अटक केली. पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे, सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अनिल बिनवडे, पोलीस कर्मचारी अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, दत्तात्रय खेडेकर, चंद्रकांत रेजीतवाड, सागर ननावरे यांनी ही कामगिरी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वेशभूषेत बदल

आरोपी राजेश पपूल सराइत आहे. घरफोडीचे गुन्हे केल्यानंतर तो पसार होण्यासाठी दुचाकी, तसेच रिक्षाचा वापर करायचा. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो त्याच्या वेशभूषेत बदल करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.