पुणे : राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू असल्याची कबुली परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. दरम्यान, ‘स्थानिक पातळीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) वेळोवेळी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या वर्षभराच्या कालावधीत ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकाकडून ७,२०६ दोषी वाहनांवर कारवाई करून सुमारे पाच कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एक लाखापेक्षा जास्त शालेय बस असून, त्यापैकी ६० हजार बसमध्ये धोकादायक पद्धतीने सुरक्षेचे नियम डावलून वाहतूक सुरू असल्याबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रश्नावर खुलासा देताना सरनाईक यांनी ‘बेकायदा वाहतूक सुरू असली, तरी स्थानिक आरटीओच्या वायुवेग पथकांकडून कारवाई सुरू आहे,’ असे स्पष्टीकरणही दिले.

सरनाईक यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यापूर्वी वाहनाचे नोंदणी पत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, परवाना, वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, वाहनचालकाचा परवाना, अग्निशामक यंत्रणा, प्रथमोपचार पेटी आदी गोष्टींची पूर्तता करणे बंधनकारक केले आहे. तसेच, स्थानिक पातळीवर अशा वाहनांची वेळोवेळी तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आर्थिक वर्ष एप्रिल २०२४ ते मार्च २०२४ पर्यंत ७,२०६ वाहनांवर कारवाई करून सुमारे पाच कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक सदस्यीय समितीची स्थापना

‘गेल्या काही दिवसांपासून शालेय वाहतूक करणाऱ्या बसच्या नियमावलीत सुधारणा करण्यासाठी शालेय संस्था, बसचालक, मालक संघटनांनी मागणी केली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे,’ असेही सरनाईक यांनी नमूद केले.