Pune Dense Fog : गेल्या काही दिवसांत शहर आणि परिसरात वाढलेला थंडीचा जोर आता कमी झाला आहे. हवेतील गारवा कायम असून तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच आता दाट धुके पडू लागले आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुणे शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढला होता. किमान तापमानात सातत्याने घट होत होती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे सहा अंश सेल्सियस, तर शिवाजीनगर येथे सात अंश सेल्सियसपर्यंत पारा घसरला होता. त्यामुळे दिवसाही हुडहुडी भरल्याचा अनुभव येत होता. चार दिवसांपूर्वीच यंदाच्या थंडीच्या हंगामातील आतापर्यंतच्या किमान तापमानाची नोंद झाली होती. मात्र, आता पुन्हा तापमानात वाढ होऊ लागली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी शिवाजीनगर येथे १२.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे.

हेही वाचा : लैंगिक अत्याचार प्रकरणी दुर्लक्ष केल्याचा ठपका, शिक्षण संस्थाचालकाला न्यायालयीन कोठडी

एकीकडे थंडीचा जोर कमी झाला असला, तरी धुक्याचे प्रमाण वाढू लागले आहे. आज (शनिवारी) शहर आणि परिसर दाट धुक्याने वेढल्याचे पाहायला मिळाले. उंच इमारती धुक्यामुळे दिसत नव्हत्या, इतके दाट धुके होते. विशेषतः मुंबई पुणे महामार्गावर दाट धुक्यामुळे वाहनचालकांना त्रास होत होता.

हेही वाचा : Narayana Murthy :…तर देशात भविष्यात मोठे स्थलांतर होईल! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा धोक्याचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढील काही दिवस थंडीचा जोर कमी राहणार आहे. त्यामुळे नाताळच्या काळात फारशी थंडी जाणवणार नाही. तसेच तापमानात काहीशी वाढ झाली असली, तरी पावसाची शक्यता नाही. महिनाअखेरीस पुन्हा एकदा थंडीचा अनुभव येणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला.