पुणे : काॅसमाॅस बँकेवर झालेल्या सायबर हल्ला प्रकरणातील ११ आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांपैकी एका आरोपीचा मृत्यू झाला होता.

फहिम मेहफूज शेख (रा. भिवंडी, ठाणे), फहिम अझीम खान (रा. आझादनगर, सिल्लोड, औरंगाबाद), शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (रा. सिल्लाेड, औरंगाबाद), महेश साहेबराव राठोड (रा. भोकर, जि. नांदेड), नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (रा. विरार, जि. पालघर), मोहम्मद सईद इक्बाल हुसेन जाफरी ऊर्फ अली (रा. हमालवाडा, दर्गा रस्ता, नांदेड), युस्टेस अगस्टीन वाझ (रा. जोगेश्वरी, मुंबई), अब्दुला अफसरअली शेख (रा. मिरा रोड, जि. ठाणे), बशीर अहमद अब्दुल अझीज शेख (रा. भायखळा, मुंबई), सलमान मोहम्मद नईम बेग (रा. तनवरनगर, मुंब्रा, जि. ठाणे), फिरोज यासीन शेख (रा. काळा चौकी, मुंबई) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा – पुणे: अक्षय्यतृतीयेला सोनेखरेदीचा उत्साह; नाणी, छोटय़ा दागिन्यांना पसंती

आरोपी फहिम शेख, फहिम खान, शेख जब्बार, महेश राठोड, नरेश महाराणा, मोहम्मद जाफरी, युस्टेस वाझ यांना न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्षे साधी कैद, २०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन दिवसांची कैद, तसेच अन्य कलमान्वये तीन वर्षे साधी कैद, १०० रुपये दंड, दंड न भरल्यास तीन दिवसांची साधी कैद, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये तीन वर्षे साधी कैद, १०० रुपये दंड, दंड न भरल्यास तीन दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपी अब्दुल शेख, बशीर शेख यांना विविध कलमान्वये दोषी ठरवून चार वर्षे साधी कैद, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये तीन वर्षे साधी कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

आरोपी सलमान बेग, फिरोज शेख यांना दोषी ठरवून न्यायालयाने तीन वर्षे साधी तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये तीन वर्षे साधी कैद, तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. काॅसमाॅस सायबर हल्ला प्रकरणातील आरोपींनी काॅसमाॅस बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील सर्व्हर यंत्रणेवर सायबर हल्ला करून काॅसमाॅस बँकेची एकूण मिळून ९४ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम लांबविली होती. आरोपींनी काही रक्कम परदेशातील बँक खात्यात वळविली होती. सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून आरोपींनी परदेशातील ज्या बँकेत रक्कम वळविली होती. त्या बँकेशी तातडीने संपर्क साधून खाती गोठविली होती. त्यासाठी पोलिसांना हाँगकाॅंग पोलिसांनी सहकार्य केले होते. भारतातील आरोपींनी बनावट डेबिट कार्डचा वापर करून रक्कम काढली होती.

हेही वाचा – पुणे: नोंदणी अधिनियमात सुधारणेसाठी समिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी कोल्हापूर, अजमेर, इंदूर, मुंबई परिसरातून १८ आरोपींना अटक केली होती. सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त देशपांडे, सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग, संभाजी कदम, सहायक आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, उपनिरीक्षक सागर पानमंद, हवालदार अस्लम अत्तार, संतोष जाधव आदींनी या प्रकरणाचा तपास केला.