महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदणी मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते या मोहिमेला पुण्यामधून आजपासून सुरुवात झाली. राज ठाकरे पुण्यात पोहोचल्यानंतर नवी पेठेतील शहर कार्यालयास भेट दिली. ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरे यांच स्वागत कऱण्यात आलं. यानंतर सर्वात प्रथम राज ठाकरेंची सदस्य म्हणून नोंदणी करत मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मात्र राज ठाकरेंच्या या कार्यक्रमादरम्यान या कार्यालयाबाहेर लागलेल्या एका पोस्टरने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं.

नक्की वाचा >> “राज ठाकरे धार्मिक द्वेष पसरवत असल्याची टीका करणाऱ्यांना हे ॲप म्हणजे सणसणीत उत्तर”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे या बॅनरवर?
राज ठाकरे हे नवी पेठे येथील कार्यालयामध्ये सदस्य नोंदणीच्या मोहिमेची सुरुवात करण्यासाठीच्या कार्यक्रमाला आले त्यावेळी ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत झालं. यावेळी या कार्यालयाबाहेर राज ठाकरेंचे अनेक बॅनर लावण्यात आले होते. यापैकी एका बॅनरने खास लक्ष वेधून घेतलं. या बॅनरवर, “आता भारत नाही, हिंदूंचा हिंदूस्थान” असं वाक्य लिहिण्यात आलं होतं. तसेच ‘हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी हिंदूजननायक’ असा उल्लेख करत राज ठाकरेंचा भगवी शाल गुंडाळलेला फोटो आणि पाठीमागे भागव्या रंगात भारताचा नकाशाही या बॅनरवर होता. भारताच्या नकाशावर ‘हिंदूंचा हिंदूस्थान’ असं लिहिण्यात आलं होतं. या बॅनरने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

नक्की वाचा >> “खरं तर लग्न झाल्या झाल्या…”; दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यावरुन राज ठाकरेंचा शिंदे सरकारला मिश्कील टोला; सभागृहात पिकला हशा

प्रत्येक मनसे शाखेसमोर लावणार बॅनर
पक्षाचे सरचिटणीस अजय शिंदे यांच्या नावाने हा बॅनर लावण्यात आला होता. यासंदर्भात बोलताना अजय शिंदे यांनी, “हिंदूंचाच हिंदुस्थान हीच आपली ओळख आहे. भारत असे संबोधित करून ही ओळख पुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापूर्वीच्या कागदपत्रांमध्ये, विदेशी पर्यटकांकडूनही हिंदुस्थान असेच नमूद करण्यात आले आहे. त्यासाठीच आता शहरात असे बॅनर उभारण्यात येतील,” असं स्पष्ट केलं आहे. तसेच, “गणेशोत्सवाच्या कालावधीत तरूणाईला त्याची माहिती दिली जाईल. त्यानंतरच्या टप्प्यात घरोघरी जाऊन हिंदूंचा हिंदुस्थान बाबत माहिती दिली जाईल. मनसेच्या प्रत्येक शाखेसमोर बॅनर उभारण्याचे नियोजित आहे. विधानसभा मतदारसंघ निहाय हे बॅनर्स उभारले जातील. गणेशोत्सवानंतर ही कार्यवाही तातडीने केली जाईल,” असंही शिंदे म्हणाले.

नक्की वाचा >> …अन् राज ठाकरेंनी हातानेच इशारा करत वसंत मोरेंना स्वत:च्या कारमध्ये बसण्यास सांगितलं; वसंत मोरे म्हणतात, “मी हो म्हटल्यानंतर…”

राज ठाकरेंच्या त्या विधानाचा परिणाम?
राज ठाकरेंनी मंगळवारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये भाषणादरम्यान केलेल्या विधानानंतर हा बॅनर लावण्यात आल्याचं दिसून येत आहे. ओवेसी बंधूंनी हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली. याचसंदर्भातून राज यांनी ‘सारे जहाँ से अच्छा’ या गाण्याचा संदर्भ देत आपण देशाचं नावं हिंदुस्तान असं घेतलं पाहिजे असंही म्हटलं.

नक्की वाचा >> ओवेसी बंधूंनी हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत राज ठाकरे संतापले; म्हणाले, “यांच्यासारखे दळिद्री…”

“कवी इक्बाल या माणासाने लिहिलेल्या काव्यामध्ये तो भारत नाही म्हणत आहे. तो काय म्हणतोय तर, सारे जहाँ से अच्छा ये हिंदुस्थान हमारा. हे हिंदूचं स्थान आहे. हे तो कवी म्हणतोय आणि आम्ही हिंदू या देशाला भारत म्हणतोय. आम्ही बोलताना बोलत पण नाही की, आम्ही हिंदुस्थानात आहोत. आमच्या भारतात म्हणतो आपण. नाहीतर अगदी सोप इंडिया,” असं म्हणत राज यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. या विधानाचा परिणाम आज राज यांच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये या बॅनरच्या माध्यमातून पहायला मिळाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray pune program banner calling to for hindustan instead of bharat pune print news scsg
First published on: 25-08-2022 at 14:00 IST