रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन राज्यामध्ये सुरु असणाऱ्या भोंग्यांसंदर्भातील राजकारणावरुन पक्षाची बाजू पुन्हा अधोरेखित केली. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली. राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

धमकीची भाषा कोणी करू नये
“सध्या महाराष्ट्रात भोंग्याचा विषय सुरू आहे. मशिदींवर अनेक वर्षे भोंगे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी भोंग्याला विरोध केला नाही. पण राज ठाकरे यांनी भगवे घालून भोंग्याला विरोध करू नये. आमचा भोंगे काढण्यास विरोध आहे. राज ठाकरे यांनी केलेला विरोध चुकीचा आहे. समाज अल्पसंख्याक आहे. धमकीची भाषा कोणी करू नये,” असं आठवले म्हणाले आहेत.

शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला
तसेच पुढे बोलताना, “राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण यांच्या वेळा सुनियोजित असतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या पण सभा मोठ्या होत होत्या. त्यांनी भगवा झेंडा केला आनंद आहे त्यांना भगवा हवा होता तर त्यांनी शिवसेना सोडायला नको होती,” असा टोलाही आठवलेंनी लगावलाय. “शिवसेना कार्यप्रमुख म्हणून राज ठाकरे यांनीच नाव सुचवलं होत, पण परत शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे,” असंही आठवले म्हणाले.

राज ठाकरे यांची भूमिका चुकीची
“३ मेला जर कोणी मशीदींवरील भोंगे काढायला आले तर माझे कार्यकर्ते मशीदींचं संरक्षण करणार आहेत. आम्ही ही दादागिरी करू शकतो पण आम्हला दादागिरी येते. पोलिसांनी यात लक्ष घालण गरजेच आहे. मुस्लिम नेत्यांनी पण संयम पाळला पाहिजे. अजान थोडा वेळाची असते. त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका चुकीची आहे,” असं आठवले म्हणाले.

आमचं अस्तित्व संपणार नाही
“भोंग्यांबाबत भाजपाने काय भूमिका घेतली माहिती नाही. पण माझी अन् माझ्या पक्षाची भूमिका मी मांडली आहे. समाजात शांतता राखवी हा आमचा प्रयत्न आहे,” असं आठवलेंनी स्पष्ट केलंय. तसेच पुढे बोलताना, “मनसे आरपीआयची जागा भाजपामध्ये घेणार नाही. राज ठाकरेंना सोबत घेतलं तर मतदार नाराज होऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरे यांना भाजपाने सोबत घेऊ नये, असं माझं मत आहे. आमचं अस्तित्व संपणार नाही,” असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सभेला परवानगी देऊ नये कारण…
“राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये. तिकडे मुस्लिम समाज जास्त आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो. म्हणून सभेला परवानगी दिली तर राज ठाकरे राज्यात वाद निर्माण करत फिरतील. समाजात वाद निर्माण होत असेल तर राज्य सरकारने लक्ष घातले पाहिजे,” असंही आठवले म्हणालेत.