पुणे मेट्रोचे नामकरण हे ‘पिंपरी-चिंचवड पुणे मेट्रो’ करावे अशी मागणी सत्ताधारी भाजपच्या भारतीय जनता युवा मार्फत करण्यात आली आहे. अशा आशयाचे निवेदन आज महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांना देण्यात आले आहे. तसेच ही बाब मेट्रो विभाग अधिकाऱ्यांच्या आणि राज्यशासनाच्या निर्दशनास आणून द्यावी अस देखील त्यांनी म्हटलंय. “पुणे मेट्रोमध्ये आपल्या शहराचा मोलाचा वाटा असुन मेट्रोला फक्त पुणे मेट्रो असे नाव न देता “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” असे नाव देण्यात काय अडचणी आहेत?, किमान ते तरी कळवावे. जर शासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” असे नाव नाही केले तर हे आम्ही शहरवासीय हे आंदोलन आणखी तीव्र करणार व जागोजागी याचा निषेध करणार.”, अशी भूमिका युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे यांनी घेतली आहे.
दरम्यान, या अगोदर महापौर माई ढोरे यांनी देखील पुणे मेट्रोचे पिंपरी-चिंचवड पुणे मेट्रो असा उल्लेख करायला हवा अस म्हटलं होतं. केवळ पुणे मेट्रो अस नाव असल्याने सध्या पिंपरी-चिंचवडकर नाराज असल्याचं दिसतंय. त्यामुळे मेट्रोच्या नामकरणाचा विषय योग्य वेळेत न झाल्यास याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, उपाध्यश स्विकृत नगरसेवक संदिप नखाते सरचिटणीस जवाहर ढोरे, तेजस्विनी कदम, विक्रांत गंगावणे व सारिका माळी हे उपस्थित होते.