पुणे : आघाडी धर्माचे पालन करून लोकसभा निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीच्या विजयासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. आता विधानसभा निवडणुकीसाठी २५ जागांवर लढण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीकडे केली आहे. पुणे शहरात पर्वती आणि खडकवासला आणि जिल्ह्यातील शिरूर मतदारसंघात लढण्यासाठी संभाजी ब्रिगेड इच्छुक आहे.

संभाजी ब्रिगेडची शिवसेनेसोबत युती असून विधानसभा निवडणुकीत २५ जागांवर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. महाविकास आघाडीतून जागांची मागणी केली असून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे आणि उत्तम कामठे यांनी मंगळवारी दिली. महानगराध्यक्ष अविनाश मोहिते आणि प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे : कुरिअरद्वारे ११९ उच्चशिक्षित तरुणांकडून मेफेड्रोनची खरेदी

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड. मनोज आखरे हे हिंगोली मतदारसंघातून तर, महासचिव सौरभ खेडेकर हे चिखली मतदारसंगातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. ’लाडक्या भावां’नी महाराष्ट्रातील लोकशाही अडचणीत आणली आहे. त्यांना पराभूत करून मंत्रालयावर भगवा फडकविण्यासाठी करावे लागेल ते करू, असे संतोष शिंदे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकशाही जागर महामेळावा

संभाजी ब्रिगेडच्या वतीने शुक्रवारी (२३ ऑगस्ट) बालगंधर्व रंगमंदिर येथे लोकशाही जागर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्यात माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे.