पुणे : राज्यातील कृषी पदवी अभ्यासक्रम आणि वास्तुकला पदवी (बी.आर्च) या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केले आहे. त्यानुसार कृषी पदवीसाठी ५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान अर्ज भरता येईल, तर वास्तुकला पदवीसाठी १३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येईल.कृषी पदवीची प्राथमिक गुणवत्ता यादी २२ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीबाबत २३ ते २५ नोव्हेंबर कालावधीत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येतील. त्यानंतर २८ नोव्हेंबरला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. दोन डिसेंबरला पहिल्या फेरीची प्रवेश यादी जाहीर झाल्यानंतर, ३ आणि ४ नोव्हेंबरला प्रवेश निश्चिती करावी लागणार आहे. तर दुसरी फेरी ७ डिसेंबरला सुरू होईल. तसेच २० डिसेंबरला कॉलेज सुरू होईल, तर १० जानेवारी प्रवेशाची अंतिम मुदत आहे.   वास्तुकला पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १३ नोव्हेंबरपर्यत नोंदणी करता येईल. याच कालावधीत विद्यार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करून १५ नोव्हेंबरपर्यत अर्जांची पडताळणी करून अर्ज अंतिम करावा लागेल. प्राथमिक गुणवत्ता यादी १७ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीवर १८ आणि १९ नोव्हेंबरला आक्षेप नोंदवता येतील. अंतिम गुणवत्ता यादी २१ नोव्हेंबरला प्रकाशित होईल. त्यानंतर २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पर्याय भरावे लागतील. २६ नोव्हेंबरला प्रवेश जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना २७ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रवेश घ्यावे लागणार आहेत. कृषी आणि वास्तुकला पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सीईटी सेलच्या http://cetcell.mahacet.org/  या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.