पुणे : उन्हाच्या झळांमुळे एकीकडे जिवाची काहिली होत आहे, तर दुसरीकडे फळे, भाजीपाला करपू लागला आहे. कोकणात हापूस, खानदेश, मराठवाड्यात केशर आणि पश्चिम महाराष्ट्रात डाळिंब, द्राक्षे आणि राज्यभरात भाजीपाला पिके करपू लागली आहेत.

राज्याच्या अन्य भागाच्या तुलनेत किनारपट्टीवर उन्हाच्या झळा कमी आहेत. तरीही कोकणातील हापूस होरपळून निघत आहे. डोंगर-उतारावरील हापूसच्या बागांमध्ये फळांची होरपळ कमी आहे, पण कातळावरील, सपाट माळरानावरील बागांमध्ये १० टक्क्यांपर्यंत काढणीला आलेली फळे करपून निघत आहेत. आंब्याची लहान फळे गळून पडत आहेत, अशी माहिती कोकण हापूस उत्पादक आणि विक्रेता संघाचे अध्यक्ष विवेक भिडे यांनी दिली.

हेही वाचा – उमेदवारीसाठी वसंत मोरेंची वणवण

महाकेसर आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे म्हणाले, की कोकणवगळता पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यातील केशर आंब्यालाही उन्हाच्या झळांचा मोठा फटका बसत आहे. काढणीला आलेल्या केशर आंब्याला होरपळीचा, तर लहान फळांची मोठ्या प्रमाणावर गळ होत आहे. यंदा चार टप्प्यांत केशरला मोहोर आल्यामुळे नुकसान वाढले आहे. चौथ्या टप्प्यातील मोहोर, लहान फळे उन्हाच्या झळांमुळे गळून जात आहेत. नव्याने केलेली आंबा लागवड वाचविण्यासाठी आंब्याच्या झाडाभोवती ताग लावला जात आहे.

हेही वाचा – अरुणाचल प्रदेशसह लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळणार, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा दावा

डाळिंबाचा अंबिया बहर सुरू आहे. डाळिंबाची लहान फुले, कळी उन्हाच्या झळांमुळे गळून पडू नयेत म्हणून डाळिंबाच्या बागांवर प्लॅस्टिकचे आच्छादन करावे लागत आहे. द्राक्ष बागांमधील लहान फुटी, कोंब उन्हामुळे करपू नयेत, यासाठीही आच्छादन करावे लागत आहे. फळझाडांच्या बुंध्याभोवती उसाचा पाला टाकून ओलावा टिकवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उन्हामुळे भाजीपाला पिकाला मोठा फटका बसत आहे. भाजीपाल्याची वाढ खुंटली आहे. भाजीपाल्याची कोवळी पाने करपून जात आहेत.

हेही वाचा – काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले

फळ, फूलगळचा धोका वाढला

वाढते तापमान आणि उन्हाच्या झळांमुळे फळे, भाजीपाला पिकांची वाढ खुंटली आहे. ओलावा टिकवून ठेवण्यासाठी जास्त पाणी द्यावे लागत आहे. अनेकदा पाण्याचा फवारा मारावा लागत आहे. प्लॅस्टिकचे आच्छादन करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीचा खर्च करावा लागत आहे. भाजीपाला पिकांची वाढ न झाल्यामुळे मे, जून महिन्यांत काढणीला येणाऱ्या भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. तापमान ३५ अंश सेल्सिअसहून जास्त झाल्यास फूलगळ, फळगळ वाढून मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. सध्या डाळिंबाचा अंबिया बहर सुरू आहे. कमी पाणी असलेल्या ठिकाणच्या डाळिंबाच्या बागा अडचणीत आल्या आहेत, अशी माहिती बारामती कृषी विज्ञान केंद्रातील भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. यशवंत जगदाळे यांनी दिली.