पिंपरी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्याम लांडे, माजी नगरसेवक विनायक रणसुभे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मुंबईत ‘मातोश्री’ येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, गटनेत्या सुलभा उबाळे आदींच्या उपस्थितीत लांडे, रणसुभे यांच्यासह मनोज बोरसे, अभिजित गोफण, सचिन सानप, मयूर लांडे, भाऊसाहेब लांडगे, अमित लांडगे आदींना ठाकरेंनी शिवबंधन धागा बांधला. लांडे २००२ मध्ये कासारवाडीतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिले. २००७ व २०१२ मध्ये लांडे यांनी महापालिका निवडणुक लढवली. दोन्हीही वेळेस त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. मात्र, ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. लोकसभा निवडणुकीत ते लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारात आघाडीवर होते. पालिका निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक समीकरणे लक्षात घेत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रणसुभे हे माजी महापौर आझम पानसरे यांचे समर्थक आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र, चिखलीतील स्थानिक राजकारणामुळे पानसरे राष्ट्रवादीत असताना रणसुभे शिवसेनेत गेले आहेत.