पुणे : ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचा अमूल्य चित्रठेवा राज्य शासनाकडून जतन करण्यात येत आहे. सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील सामंजस्य करारावर बुधवारी स्वाक्षरी करण्यात आली.

रवी परांजपे यांनी साकारलेली ७२ चित्रे आणि ६७ फ्रेम आर्ट वर्क अशा १३९ चित्रकृती महाराष्ट्र शासनास सुपूर्त करण्यात आल्या असून सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज कला संग्रहालय येथे त्यांचे जतन करण्यात येत आहे. मॉडेल कॉलनी येथील परांजपे यांच्या निवासस्थानी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कलाकृती सन्मानपूर्वक जतन करु, अशी ग्वाही शेलार यांनी याप्रसंगी दिली. परांजपे यांच्या पत्नी स्मिता परांजपे आणि पुरातत्त्व विभाग व संग्रहालय विभागाचे उपसंचालक हेमंत दळवी यांनी करारावर स्वाक्षरी केली.

शेलार म्हणाले, ‘कॅनव्हासवर कलाकारांच्या रेषा बोलतात आणि रंग नाचू लागतो असा समाज प्रगल्भ असतो. संवेदना आणि सहवेदना जागृत करण्यामध्ये चित्रकलेचा मोठा वाटा आहे. चित्रसाक्षरता हा परांजपे सातत्याने मांडत असलेला विषय ऐरणीवर आला आहे. समाजातील चित्रसाक्षरता वाढवण्यासाठी हा चित्रठेवा उपयुक्त ठरेल. सुमारे साडेचार कोटी रुपयांहून अधिक रक्कम असलेल्या या कलाकृती सध्या सातारा संग्रहालयामध्ये तात्पुरत्या स्वरुपात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. नंतर राज्यभर या चित्रकृती शासनाच्या अखत्यारितील विविध संग्रहालयांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या चित्रकृतींमधील मोठा भाग मुंबई येथील नियोजित महाराष्ट्र राज्य वस्तुसंग्रहालयामध्ये प्रदर्शित करण्याचेही प्रस्तावित आहे, असेही शेलार यांनी सांगितले.

कोट सध्या ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्तेचा) बोलबाला होत आहे. मात्र, ‘सर्जनशील बुद्धिमत्ता’ (क्रिएटिव्ह इंटेलिजन्स -सीआय) ही त्याहून अधिक महत्त्वाची आहे. परांजपे यांची चित्रे ही ‘सीआय’ची आदर्श उदाहरणे आहेत. – आशिष शेलार, सांस्कृतिकमंत्री