पुणे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या (एमओआरटीएच) माध्यमातून पुणे विभागातील महामार्गांवरील अपघातप्रवण क्षेत्रांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या महामार्गांवरील २२ पैकी १६ अपघातप्रवण ठिकाणे वाहतूक कोंडीमुक्त झाली असल्याचा दावा ‘एनएचएआय’कडून करण्यात आला आहे. उर्वरित सहा ठिकाणांवरील कामे मंजुरी आणि निविदा प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असून, लवकरच ती पूर्ण करण्यात येणार आहेत.
अपघातप्रवण ठिकाणांमध्ये पुणे-सातारा महामार्ग (एनएच ४८), पुणे-सोलापूर (एनएच ९६५ पालखी मार्ग) आणि पुणे-नाशिक फाटा (खेड विभाग) मार्ग या तीन राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. या ठिकाणी रस्त्यांवर सातत्याने अपघात आणि वाहतूककोंडी होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून संबंधित १६ ठिकाणी वेगमर्यादेसाठी सीसीटीव्ही नियंत्रण, वेगक्षमता कालमापक निश्चिती, रम्बल स्ट्रिप्स, फलक, पर्यायी सेवा रस्ते आदी दुरुस्ती करण्यात आली आहे.
‘पुणे विभागातील महामार्गांवर अपघातप्रवण ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजनांंची अंमलबजावणी करण्यात येत असून, २२ ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. या ठिकाणी वारंवार अपघात होणे, वाहतूककोंडीसारख्या समस्या प्रकर्षाने समोर आल्या होत्या. संबंधित ठिकाणांवर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना सुलभ प्रवास करण्यासाठी रस्तेमार्ग उपलब्ध करून देण्यासाठी पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि स्थानिक संस्थांच्या समन्वयानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार महामार्गांवर अपघातप्रवण ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे,’ अशी माहिती ‘एनएचएआय’चे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.
पुणे-सातारा रस्त्यावरील उपाययोजना
पुणे-सातारा महामार्गावरील नवले पूल, वारजे चौक, वडगाव पूल आणि कात्रज बोगद्याजवळ रस्त्यांची वळण रचना व वाहतूककोंडी ही अपघातांची प्रमुख कारणे होती. तसेच, वडगाव पूल, खेड शिवापूर टोल प्लाझा, भोर फाटा, कात्रज बोगदा ते नवा कात्रज बोगदा, कात्रज घाट प्रवेशद्वार, कात्रज घाटातून बाहेर पडणाऱ्या भागांवर अपघातजन्य परिस्थिती होती. ती दूर करण्यासाठी येथे महामार्ग प्राधिकरणाने सेवा रस्ते, मार्गिका संक्रमण, ‘क्रॅश बॅरिअर्स’, ‘रिफ्लेक्टिव्ह साइनबोर्ड’, ‘रम्बल स्ट्रिप्स’ आणि सुधारित प्रकाशव्यवस्था अशा उपाययोजना केल्या. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका कमी झाला असून, वाहतुकीचा वेग सुधारत आहे.
पालखी महामार्गावरील कामे
पालखी महामार्गावर सासवड फाटा, जेजुरी, वाल्हे, लोणंदसारख्या गावांजवळ पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. ती काढण्यात आली. या ठिकाणी वेग नियंत्रक, रस्ते रेखांकन, डिजिटल फलक आणि पुरेपूर प्रकाशव्यवस्था अशा उपाययोजना केल्या आहेत.
पुणे-नाशिक मार्गावरील अतिक्रमणांंवर कारवाई
पुणे-नाशिक महामार्ग (खेड परिसर), नाशिक फाटा, मोशी चौक, आळंदी फाटा, मरकळ फाटा, चिंबळी फाटा, चाकण एमआयडीसी रस्ता चौक, कुरुळी फाटा, राजगुरूनगर बायपास चौक आदी ठिकाणी अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. रस्त्यांवर पडलेले खड्डे दुरुस्त करून रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. तसेच, वेगमर्यादेसाठी गतिरोधक निर्माण करण्यात आले आहेत.