पुणे : राज्यातील पाणी नमुन्यांची तपासणी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून केली जाते. या तपासणीत मे महिन्यात छत्रपती संभाजीनगरमधील पाणी सर्वांत दूषित असल्याचे आढळले असून, जूनमध्ये रत्नागिरीमध्ये दूषित पाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यंदा मेमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने दूषित पाणी नमुन्यांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले.
सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या मे महिन्यातील अहवालानुसार, राज्यातील ३५ जिल्ह्यांतून १ लाख ८ हजार ७२० पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ४ हजार ३०७ म्हणजेच ४ टक्के पाणी नमुने दूषित आढळले. यात ग्रामीण भागातील ६२ हजार ५७८ नमुन्यांपैकी २ हजार ७०४ आणि शहरी भागातील ४६ हजार १४२ नमुन्यांपैकी १ हजार ६०३ नमुने दूषित आढळले. राज्यात मेमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील सर्वाधिक १३.९ टक्के पाणी नमुने दूषित आढळले. त्याखालोखाल बीड आणि धाराशिवमध्ये प्रत्येकी १०.७ टक्के पाणी नमुने दूषित आढळले. त्यानंतर सिंधुदुर्ग ९.३ टक्के आणि गडचिरोलीत ९.२ टक्के पाणी नमुने दूषित आढळले.
राज्यातील १ लाख १५ हजार ९०७ पाणी नमुन्यांची जूनमध्ये तपासणी करण्यात आली. त्यातील ५ हजार ५७८ म्हणजेच ५ टक्के पाणी नमुने दूषित आढळले. यात ग्रामीण भागातील ६६ हजार ८५९ नमुन्यांपैकी ३ हजार २७६ आणि शहरी भागातील ४९ हजार ४८ नमुन्यांपैकी २ हजार ३०२ नमुने दूषित आढळले. राज्यात जूनमध्ये रत्नागिरीत सर्वाधिक १८ टक्के पाणी नमुने दूषित आढळले. त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर आणि रायगड जिल्ह्यात प्रत्येकी १४ टक्के पाणी नमुने दूषित आढळले. त्यानंतर बीडमध्ये १२ टक्के आणि गडचिरोलीत १० टक्के पाणी नमुने दूषित आढळले.
राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून राज्यातील पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. या तपासणीत दूषित पाणी नमुने आढळल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेसह जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविण्यात येते. दूषित पाण्यामुळे आजार पसरू नयेत, यासाठी ही खबरदारी घेतली जाते. याचबरोबर नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पिण्यास मिळावे, हा यामागील उद्देश आहे. – डॉ. विनोद फाळे, उपसंचालक, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मेमधील आकडेवारी
जिल्हा – एकूण नमुने – दूषित नमुने
- छत्रपती संभाजीनगर – २३३७ – ३२६
- बीड – ७४६ – ८०
- धाराशिव – २७९५ – ३००
- सिंधुदुर्ग – ८७३ – ७३
- गडचिरोली – २०६५ – ४२
जूनधील आकडेवारी
जिल्हा – एकूण नमुने – दूषित नमुने
- रत्नागिरी – २८१ – ५०
- छत्रपती संभाजीनगर – ३४३७० – ४९१
- रायगड – १५११ – २०६
- बीड – ८९७ – १०८
- गडचिरोली – १४६९ – १४१