उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

पुणे : राज्यात प्राणवायूच्या खाटांची मागणी वाढत गेल्यास आणि दैनंदिन वैद्यकीय प्राणवायूची मागणी ७०० मेट्रिक टनांपर्यंत गेल्यास राज्यातील निर्बंधांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली. 

करोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘राज्यात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असले, तरी गंभीर होणाऱ्या रुग्णांची संख्या मर्यादित आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या करोनाबाधित रुग्णांना प्राणवायूची गरजही फार लागत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, आगामी काळात प्राणवायूच्या खाटांची संख्या वाढत गेल्यास, तसेच वैद्यकीय प्राणवायूची मागणी ७०० मे. टनांपर्यंत गेल्यास निर्बंधांबाबत स्वत: मुख्यमंत्री ठाकरे कठोर निर्णय घेतील.’ 

…मी शब्द मागे घेतो

राज्यातील वैद्यकीय प्राणवायूची मागणी ७०० टनांपर्यंत गेल्यास मुख्यमंत्री आदित्य ठाकरे निर्बंधांबाबत कठोर निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री पवार सुरुवातीला म्हणाले. मात्र, चूक लक्षात येताच मी शब्द मागे घेतो, असे म्हणत पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंधांबाबत निर्णय घेतील, असे सांगितले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

करोनाबाधित नसलेल्या उमेदवारांना परत आणणार 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लष्कर भरती परीक्षेसाठी राज्यातून आसाममध्ये गेलेल्या उमेदवारांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र, करोनाबाधित नसलेल्या उमेदवारांना तातडीने परत आणण्यात येणार आहे. ज्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे, त्याची चाचणी नकारात्मक आल्यावर त्यांनाही परत आणण्यात येईल. तोपर्यंत त्यांना विलगीकरणात योग्य उपचार सुविधा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व उमेदवारांना सुस्थितीत आणण्यास महाविकास आघाडी सरकार तत्पर आहे, असेही पवार यांनी या वेळी सांगितले.