scorecardresearch

‘आदर्श शिक्षक’साठी विद्यार्थ्यांचे आकलन महत्त्वाचे; राज्य शासनाकडून पुरस्कारासाठीचे सुधारित निकष

राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराच्या निवड प्रक्रियेत आता शिक्षक कसे शिकवतात आणि त्यांनी शिकवलेले विद्यार्थ्यांना किती कळते, हे मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत.

pv teacher
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराच्या निवड प्रक्रियेत आता शिक्षक कसे शिकवतात आणि त्यांनी शिकवलेले विद्यार्थ्यांना किती कळते, हे मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत. ही तपासणी द्विसदस्यीय पथकाकडून करण्यात येणार आहे. तपासणीत मिळालेले गुण पुरस्कारासाठी विचारात घेतले जाणार असल्याने अध्यापन कौशल्य पुरस्कारासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

राज्य शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतात. या अर्जाची छाननी करून पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या नावांची घोषणा १५ ऑगस्टला जाहीर करून शिक्षकदिनी, ५ सप्टेंबरला पुरस्कार प्रदान कार्यक्रम होतो. मात्र राज्य शिक्षक पुरस्कारांच्या निकषांमध्ये बदल करण्यात आला आहे. या सुधारित निकषांसंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला.

या पुरस्कारांमध्ये एकूण ११९ पुरस्कार दिले जातील. त्यात प्राथमिक स्तरावर ३८ आणि माध्यमिक स्तरावर ३९ पुरस्कारांसाठी ११४ शिफारशी केल्या जातील. आदिवासी क्षेत्रासाठीच्या १९ पुरस्कारांसाठी ५७, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती  सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारातील आठ पुरस्कारांसाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार ३६ शिफारशी, कला आणि क्रीडा विशेष शिक्षक पुरस्कारातील प्रत्येकी एक अशा दोन पुरस्कारांसाठी ३६ शिफारशी, अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक पुरस्कारासाठी ३६ शिफारशी, स्काऊट आणि गाईडच्या दोन पुरस्कारांसाठी प्रत्येकी ३६ शिफारशी केल्या जातील, असे नमूद करण्यात आले आहे. 

शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक संशोधन, वृत्तपत्र किंवा नियतकालिकात लेखन, शिक्षक शिकवत असलेल्या वर्गातील अध्यापन विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांस मिळालेले पुरस्कार, शिक्षकाने विविध क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी मिळालेले पुरस्कार, शाळेच्या उन्नतीसाठी शिक्षकाने समाजाकडून गेल्या पाच वर्षांत मिळवलेले योगदान, स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, पाच वर्षांत शाळेत दाखल केलेले शाळाबाह्य विद्यार्थी, शासनाच्या  संकेतस्थळावरील साहित्य निर्मिती आणि विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती, पाच वर्षांत पटसंख्येत झालेली वाढ, अशा निकषांवर शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात येईल.

नवीन निवड प्रक्रिया..

आतापर्यंत विद्यार्थ्यांचे पाच वर्षांचे निकाल सादर करावे लागत होते. मात्र आता त्या बरोबर समितीकडून विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन अध्ययन निष्पत्तीची तपासणी करण्यात येईल. त्यातील गुण पुरस्कारासाठी विचारात घेतले जातील. पुरस्काराची निवड प्रक्रिया माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक स्तरावरून राबवली जाईल, तर तांत्रिक जबाबदारी शिक्षण आयुक्तालयातील ई गव्हर्नन्स कक्षाची असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पुरस्काराला सावित्रीबाई फुले यांचे नाव..

राज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे पुरस्काराचे नाव आता क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार असे करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Student comprehension important ideal teacher revised criteria award state government ysh