विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबद्दल आणि त्यांच्या पक्षाबद्दल केलेल्या टिप्पणीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना प्रत्त्युत्तर दिलं. तसेच, यावेळी त्यांनी विविध मुद्य्यांवर प्रतिक्रिया देखील दिली.
गोव्यात शरद पवार भाजपाला आव्हान देण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस यांनी म्हटलं होतं की, “हे पाहा विरोधकांचं म्हटलं तर शरद पवारांचा पक्ष असा आहे की, ‘पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया उसके जैसा… ’, मग ते कधी समाजवादी पार्टीशी चर्चा करतात, कधी काँग्रेसशी तर कधी टीएमसीशी बोलतात. कारण ती काही राष्ट्रीय पार्टी नाही. त्यांचं काही राष्ट्रीय अस्तित्वही नाही, त्यांचे काही राष्ट्रीय विचारही नाही. नाव राष्ट्रवादी नक्कीच असेल परंतु ती पश्चिम महाराष्ट्राची पार्टी आहे, थोडी महाराष्ट्राची पार्टी आहे. या पेक्षा ती मोठी पार्टी नाही.”




यावर आज प्रत्त्युत्तर देतान सुप्रिया सुळे यांनी, “ते त्यांचे (फडणवीसांचे) वैयक्तिक मत आहे आणि ते एक गोष्ट सांगायला विसरले, की त्यांच्याच केंद्र सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण दिलं होतं. ते माध्यमांना सांगायला ते विसरले असतील.” असं बोलून दाखवलं.
भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल काय म्हटले होते –
तर “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं!” असं म्हणत भाजपाने देखील राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला होता.
“नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही ; शेवटी राजकारण करायला…” भाजपाने साधला निशाणा!
तसेच, भाजपाकडून महाविकास आघाडी सरकाच्या कारभारावर टीका केली जात आहे, यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, “विरोधक बोलायचं काम करत रहावं, मुख्यमंत्री काम करत राहातील. मात्र कोविडच्या काळातील कामगरीबद्दल परदेशांसह केंद्र सरकारने देखील महाराष्ट्राचं कौतुक केलेलं आहे.”
मी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देखील विनंती करणार आहे की… –
याचबरोबर शाळांच्या संदर्भात बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, “खरंतर माझी महाराष्ट्र सरकारला प्रांजळ विनंती राहील, की सरसकट शाळा बंद करणं हे खरंच किती योग्य आहे. कारण, माध्यामांमधून बघायला मिळालं, की नाशिक, हिवरेबाजार येथे कोविडच्या काळात अतिशय उत्तमरित्या शाळा चालवलेले अशी चांगली उदाहरण राज्यात दिसून आली आहेत. मी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देखील विनंती करणार आहे की, त्यांनी शिक्षणमंत्री टास्क फोर्स यांनी एकत्र मिळून, या ज्या यशकथा आहेत, जिथे कोविड काळतही अतिशय चांगल्या पद्धतीने शाळा सुरू आहेत आणि कोणत्याही विद्यार्थ्याला काहीही त्रास झालेला नाही, अशी माहिती दिसून येते. तर, टास्क फोर्सचं म्हणणं आणि पालक आणि शिक्षकांची माहिती घेऊन, यातून काहीतरी सुवर्णमध्य साधून आपल्याला टप्प्याटप्याने जर शाळा सुरू करता आल्या, मला वाटतं मुलांच्या शिक्षणाला खूप मदतीचा हात होईल. कारण, ऑनलाईनच्याही शिक्षणात मुलांचं खूप नुकसान केवळ आपल्या राज्यात, देशात नाही तर जगभरात झालेलं आहे. ते कुठेतरी भरून काढण्याची गरज आहे. पालक शिक्षक, स्थानिक अधिकारी या सगळ्यांनी मिळून सर्व परिस्थितीचा अभ्यास करून शाळेबाबत निर्णय घ्यावा असं मला वाटतं.”