लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार परीक्षेत ११ हजार १६८ उमेदवार पात्र ठरले असून, एकूण निकाल ३.३८ टक्के लागला आहे.

परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी निकालाची माहिती परिपत्रकाद्वारे दिली. परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतरिम निकाल ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करून आक्षेप नोंदवण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आता अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यभरातील एकूण ३ लाख ५३ हजार ९५२ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. त्यात ११ हजार १६८ परीक्षार्थी पात्र ठरले आहेत. पहिली ते पाचवीच्या पेपर एकची परीक्षा दिलेल्या १ लाख ५२ हजार ६०५ उमेदवारांपैकी ४ हजार ७०९ उमेदवार (३.३१ टक्के) पात्र ठरले. सहावी ते आठवीच्या गणित-विज्ञानाच्या पेपर दोनची परीक्षा दिलेल्या ७५ हजार ५९९ उमेदवारांपैकी ३.४२ टक्के अर्थात २ हजार ४१४ उमेदवार, तर सहावी ते आठवीच्या सामाजिकशास्त्राच्या पेपर दोनची परीक्षा दिलेल्या १ लाख २५ हजार ७४८ उमेदवारांपैकी ४ हजार ४५ उमेदवार (३.४५ टक्के) पात्र ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम) यांच्यामार्फत पाठवण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.