लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: लष्करात अधिकारी असल्याची बतावणी करुन नोकरीच्या आमिषाने पैसे उकळणाऱ्या तोतयाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पकडले. खंडणी विरोधी पथक, तसेच लष्कराच्या गुप्तचर विभागाने ही कारवाई केली.
प्रमोद भीमराव यादव (वय २७, रा. अमृतवाडी, ता. जत, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे. आरोपी प्रमाेदचे वडील लष्करातून निवृत्त झाले आहेत. प्रमोदला लष्करात भरती व्हायचे होते. मात्र, तो लष्करात भरती होऊ शकला नव्हता. प्रमोदने लष्करात भरती झाल्याची बतावणी कुटुंबीयांकडे केली होती. त्यानंतर त्याने लष्करात अधिकारी असल्याचे सांगून तरुणांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. त्याने तरुणांकडून पैसे उकळल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती. लष्करी अधिकाऱ्यांनी पुणे पोलीस दलातील अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने आरोपी प्रमोदला सांगली जिल्ह्यातील जत परिसरात सापळा लावून पकडले.
अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, विजय गुरव, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे आदींनी ही कारवाई केली.
लष्करात नोकरीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक
आरोपी प्रमोद यादवने लष्करात अधिकारी असल्याचे सांगून १३ तरुणांची फसवणूक केली आहे. त्यांच्या बँक खात्याची चौकशी करण्यात आली आहे. त्याने ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.
तोतया लष्करी अधिकाऱ्याचे चार विवाह
आरोपी प्रमोद यादवच्या विरुद्ध एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याचाविरुद्ध १६ लाखांची फसवणूक, बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादवने चार विवाह केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. —-