श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा यंदाचाही गणेशोत्सव मंदिरामध्येच होणार – अशोक गोडसे

ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन भक्तांना घरबसल्या बाप्पाची आरती करण्याचा अनुभव मिळणार.

(संग्रहित छायाचित्र)

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव यंदा देखील मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. तर भाविकांना ऑनलाईन दर्शन सुविधासह ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन भक्तांना घरबसल्या बाप्पाची आरती करण्याचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून घेता येणार आहे, अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे देखील उपस्थित होते.

यावेळी अशोक गोडसे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार जास्तीत जास्त भक्तांनी ऑनलाईन दर्शन घ्यावे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही यंदा ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्टय असणार आहे. यामुळे आपण गाभा-यात उभे राहून प्रत्यक्ष आरती करीत असल्याचा अनुभव व्हिडिओ पाहून भक्तांना घेता येणार आहे. त्याबाबत आम्ही लिंक देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, शासनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश मिळत नाही. तसेच उत्सवाच्या काळात ट्रस्टचे विश्वस्त आणि कार्यकर्ते देखील मंदिरात जाणार नसल्याचा निर्णय ट्रस्टने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

दररोज २१ किलो मिष्टांनांचा भोग दाखविला जाणार –

गणेशोत्सवात मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. तसेच दररोज २१ किलो वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईसह मिष्टांनांचा भोग बाप्पाच्या चरणी अपर्ण केला जाणार आहे. तसेच दररोज वेगवेगळे महाउपरणे देखील घालण्यात येणार आहे. अष्टविनायकांची मयुरेश्वर, सिद्धीविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीजात्मज, विघ्नेश्वर, महागणपती ही ८ नावे, दगडूशेठ आणि गणाधिश अशी १० उपरणी तयार करण्यात आली आहे. यातील एक उपरणे दररोज बाप्पाना घालण्यात येणार आहे. अशी देखील माहिती देण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: This years ganeshotsav of shrimant dagdusheth halwai ganpati will also be held in the temple ashok godse msr 87 svk

ताज्या बातम्या