नियमभंग करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर रस्त्यावर करण्यात येणारी वाहतूक पोलिसांची कारवाई थंडावली असली तरी पोलिसांनी आता ऑनलाइन कारवाईवर भर दिला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तसेच वाहतूक पोलिसांच्या सतर्क अॅपच्या माध्यमातून नियमभंग करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्यात येत आहे.
वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर करण्यात येणारी कारवाई शिथिल करून नागपूर, मुंबई प्रमाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले होते. हेल्मेट परिधान न करणे तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर चौकाचौकात थांबून पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. वाहनचालकांना अडवून होणाऱ्या कारवाईमुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली होती. शहरातील लोकप्रतिनिधींनी या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सतर्क अॅपच्या माध्यामातून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरू करण्यात आली.
पोलिसांनी प्रत्यक्ष कारवाई कमी केली असून ऑनलाइन कारवाईवर भर दिला आहे. सीसीटीव्ही तसेच सतर्क अॅपच्या माध्यमातून दररोज अडीच ते तीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती वाहतूक शाखेतील सूत्रांनी दिली.
हेल्मेट परिधान न करणे, पादचारी पट्टयांवर वाहने लावणे (झेब्रा क्रॉंसिंग), दुचाकीवरून तिघे जण जाणे (ट्रिपलसिट), विरूद्ध दिशेने वाहने चालविणे अशा प्रकारचा नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. वाहनचालकांना कारवाई केल्यानंतर पोलिसांकडून नियमभंगाचा प्रकार, छायाचित्र तसेच दंडाची रक्कम अशी माहिती असलेले टपाल घरपोच पाठविण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांनी टपाल खात्याची मदत घेतली आहे.
वाहनचालकांना अडवण्याची गरज नाही
ऑनलाईन कारवाईमुळे पोलिसांना चौकात वाहनचालकांना अडवण्याची गरज राहिलेली नाही. त्यामुळे पोलीस आणि दुचाकीस्वारांमध्ये होणाऱ्या वादाच्या घटना गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे तसेच सतर्क अॅपचा वापर करून दररोज अडीच ते तीन हजार वाहनचालकांवर ऑनलाईन कारवाई करण्यात येत आहे.