शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्यावर मंगळवारी (२ ऑगस्ट) पुण्यातील कात्रज चौकात झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची काल कात्रज चौकातील सभा झाल्यानंतर तेथून काही कार्यकर्ते जात होते. त्यावेळी शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांची कार कार्यकर्त्यांना दिसली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत, गाडीची काचदेखील फोडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामध्ये गाडीतील एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर उदय सामंत यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी रात्रभर छापेमारी करीत शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पाचजणांना अटक केली आहे. या अटकेमुळे पुणे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून येणार्‍या काळात शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणखी वाद चिघळण्याची शक्यता आहे.

सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “असा भ्याड हल्ला करून, दगड मारून पळून जाणं म्हणजे काही मर्दुमकी नाही,” अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. “प्रत्येकाने कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे. ती जबाबदारी आपल्या सर्वांची असून सर्व नियमांचे पालन झाले पाहिजे. कायदा सुव्यवस्था कोणी बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर, त्यावर पोलीस कारवाई करतील,” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

पाहा व्हिडीओ –

तसेच ते पुढे म्हणाले की, “राज्यात सर्वांनी जातीय, सामाजिक सलोखा राखला पाहिजे. शांतता राखली पाहिजे. यामध्ये कोणीही आततायीपणा करत असेल तर पोलीस त्यावर कारवाई करतील.” शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानं गाड्या फोडण्याची चिथावणीखोर भाषा केली होती. त्यानंतर ही घटना घडली आहे. त्यावर ते म्हणाले की, “जे कोणी चिथावणीखोर भाषा करतील, त्याची तपासणी पोलीस करतील आणि अशावर निश्चित कारवाई होईल.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant car attacked case five including pune shivsena city chief arrested by police svk 88 scsg
First published on: 03-08-2022 at 08:52 IST