इंदापूर : पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण काठोकाठ भरले आहे. जुलै महिन्यात पहिल्यांदाच ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे.
मागील ४५ वर्षांत पहिल्यांदाच उजनी धरणाच्या पाण्याची पातळी मे महिन्यात उणे साठ्यातून चलसाठ्यात आली. जुलै महिन्यात शंभर टक्क्यांपर्यंत पाणीपातळी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मागील महिन्यात हे धरण शंभर टक्के भरले असते. मात्र, आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन पूर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात नदीपात्राद्वारे पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
दौंड येथून साडेसात हजार क्युसेकने पाणी येत आहे. सध्या वीज निर्मितीसाठी १६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, यंदा पाणीसाठा समाधानकारक झाल्यामुळे शेतकऱ्यांसह औद्योगिक क्षेत्रात नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. धरण शंभर टक्के भरण्याच्या उंबरठ्यावर असले, तरी इंदापूर तालुक्यात गेल्या १५ दिवसांत पावसाने ओढ दिली आहे.