पुणे : पुणे शहराच्या गणेशोत्सवाची चर्चा केवळ देशातच नव्हे तर परदेशात देखील होत असते. त्यातच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्यउत्सव म्हणून मान्यता द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी घेतला आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे यंदाचे ३०० वे वर्ष आहे. त्यांना विविध कार्यक्रमातून, उपक्रमातून आदरांजली वाहण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना आदरांजली वाहण्यासाठी मोहोळ यांनी कोथरूड येथील साई मित्र मंडळाचा यंदाच्या वर्षीचा संपूर्ण कारभार महिलांच्या हाती देण्याचे जाहीर केले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाची अध्यक्षापासून सर्व पदाधिकारी पदाची जबाबदारी महिलांकडे देण्यात आली आहे. उत्सवाच्या काळात संपूर्ण नियोजन महिला करणार आहेत. साई मित्र मंडळ यंदा वेरुळ येथील ‘ कैलास मंदीर ‘ साकारणार आहे. या देखाव्याच्या कामाचे कळसपूजन चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी ही घोषणा केली.
याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘गणेश मंडळांचा मुख्य कारभार पुरूष मंडळींच्याच हातात असतो. मंडळातील महिला भगिनी काम करतातच, मात्र त्यांना खुले व्यासपीठ मिळत नाही. मात्र हे चित्र बदलायचे असून यंदाचे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे ३०० वे वर्षे आपण साजरे करत आहोत. त्यानिमित्ताने आमच्या मंडळातील महिला भगिनी अनोखी आदरांजली वाहतील. अहिल्यादेवींच्या चरित्रापासून महिला वर्गाल स्फूर्ती मिळावी आणि त्यांचा सार्वजनिक कामातील माताभिगीनींचा आत्मविश्वास, सहभाग वाढवण्यासाठी आम्ही सर्वांनी ही निर्णय घेतला आहे’
यंदाच्या वर्षी ३० वा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, अशीच भव्य, आकर्षक आणि कलात्मक प्रतिकृती सादर करताना मंडळाची धुरा महिलांच्या हातात त्यांनी दिली आहे. यंदाच्या उत्सवाचे सर्व संयोजन महिलाभगिनी करणार आहेत. त्यांना सहाय्यक म्हणून पुरूष कार्यकर्ते काम करणार आहेत
काय आहे यंदाचा देखावा
भारतीय शिल्पकारांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका पाषाणात कैलास लेणीची केलेली निर्मिती हे जगभरासाठी आश्चर्य ठरले आहे. ही लेणी बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने परदेशी पर्यटक दरवर्षी वेरूळला भेट देतात. या कैलास लेणी संकुलातील ‘कैलास मंदिराची’ प्रतिकृती मंडळाच्यावतीने यंदा करण्यात येणार आहे.