पुणे : पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पावले उचण्यास सुरुवात केली आहे. विमानतळाचे संयुक्त सर्वेक्षण करण्यास परवानगी देऊन धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासण्यासाठी हवाई दलाला सूचना कराव्यात, अशी विनंती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना मोहोळ यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्ताराला गती मिळण्याची चिन्हे आहेत.

मोहोळ यांनी पत्रात म्हटले आहे की, भारत सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाची देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठ आहे. त्यातही पुणे विमानतळ हे देशातील व्यग्र विमानतळांच्या यादीत ९ व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी ८० लाखांहून अधिक प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला. भविष्यात ही वाढ कायम राखण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसह विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा…‘ससून’मधील गोंधळ संपेना! तीन आठवड्यांत पुन्हा नवीन अधिष्ठाता नेमण्याचा प्रकार

युरोपमधील देशांसह अमेरिका, जपान या देशांशी पुण्यातून थेट आंतरराष्ट्रीय विमान सेवा नसल्यामुळे शहराच्या विकासावर गंभीर परिणाम होत आहेत. मोठ्या आकाराच्या विमानांची सेवा विमानतळावरून सुरू होण्यासाठी सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करण्याची गरज आहे. हवाई दलाच्या मालकीच्या पुणे विमानतळाच्या सध्याच्या धावपट्टीचा विस्तार केल्यास मोठ्या विमानांची विमानतळावर ये-जा होऊ शकेल आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेतही वाढ होईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हजार मीटरने लांबी वाढवावी लागणार

पुणे विमानतळावरील सध्याच्या धावपट्टीची लांबी २ हजार ५३५ मीटर आणि ४५ मीटर रुंद आहे. या धावपट्टीवर एबी-३२१ प्रकारापर्यंतची विमाने उतरू शकतात. मात्र, त्यापेक्षा मोठ्या विमानांना उतरण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढवावी लागणार आहे. धावपट्टीची लांबी एक हजार मीटरने वाढवावी लागणार आहे. यानंतर मोठी विमाने धावपट्टीवर उतरू शकतील आणि आंतरराष्ट्रीय विमानांची संख्याही वाढेल.

हेही वाचा…पुणे रेल्वे स्थानकावर आता प्रीपेड रिक्षा! प्रवाशांची लूट थांबणार; मोबाईल अ‍ॅपद्वारे मिळणार सेवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे हे शैक्षणिक, औद्योगिक आणि आयटी हब असल्याने या प्रस्तावामुळे शहराच्या विकासाला आणि मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. नवीन विमानतळ उभारण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासण्यासाठी योग्य सूचना देण्याची विनंती संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना करण्यात आली आहे. त्यांची सोमवारी भेटही घेणार आहे. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, नागरी हवाई वाहतूक