कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असताना, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाशी युती करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीनेही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.पक्षाध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडे चार उमेदवारांची नावे पाठविण्यात आली आहेत. मात्र, कसबा आणि चिंचवड येथे शिवसेनेचे उमेदवार असतील तर तेथे आमचा उमेदवार रिंगणात नसेल, असे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मुनव्वर कुरेशी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>पुणे: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; गुन्हा दाखल
वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि संभाजी ब्रिगेड यांची शनिवारी (४ फेब्रुवारी) मालधक्का चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संयुक्त बैठक होणार आहे. त्यामध्ये रणनीती स्पष्ट होईल, असे कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, महाविकास आघाडीमध्ये कसबा काँग्रेस उमेदवारासाठी सोडण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात असेल का, याविषयी अंतिम निर्णय प्रकाश आंबेडकर हेच घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.