पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात मध्यरात्री दोन जणांनी लाकडी दांडक्याने ५ वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवर आलेल्या दोघांनी मध्यरात्री पिंपळे गुरव परिसरातील कल्पतरू सोसायटी जवळील रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेल्या चार चाकी वाहनांची तोडफोड केली. या वाहनांच्या काचा फोडून सामान्य नागरिकांचे नुकसान करण्यात आले आहे. मागिल काही दिवसांपासून शहरात वारंवार वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडत आहेत. हे कृत्य करणाऱ्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसत आहे. बहुतांश या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असतो. मद्यपान करून धिंगाणा घालत सर्व सामान्य नागरिकांना भीतीच्या सावटाखाली ठेवायचं हाच या मागचा उद्देश या अज्ञात आरोपींचा असतो. त्यांचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत.