पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) वाहन निरीक्षकांकडून होणारी वाहनांच्या तंदुरूस्तीची तपासणी लवकरच इतिहासजमा होणार आहे. ही तपासणी स्वयंचलित पद्धतीने करून वाहनांना योग्यतेचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी राज्यभरात २३ स्वयंचलित तपासणी व प्रमाणपत्र केंद्रे सुरू होणार आहेत. पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत दिवे घाट येथे हे केंद्र सुरू होणार आहे. याचबरोबर मुंबईत ताडदेव, ठाणे, कल्याण आणि पनवेल या आरटीओ कार्यालयांमध्ये ही केंद्रे सुरू होणार आहेत.

परिवहन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात २३ ठिकाणी ही केंद्रे सुरू केली जाणार आहेत. यासाठी राज्य सरकारने ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा आदेशही सरकारने काढला आहे. रस्ता सुरक्षा निधीतून हा निधी वितरित केला जाणार आहे. स्वयंचलित तपासणी आणि प्रमाणपत्र केंद्रांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. याबाबत प्रत्येक आरटीओमध्ये एक जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याजागी हे केंद्र उभारले जाईल. राज्यभरात ही केंद्रे मार्च २०२४ अखेरपर्यंत सुरू झालेली असतील.

हेही वाचा… खासदार संजय राऊत धमकी प्रकरणात पुण्यातून एकजण ताब्यात

राज्यात व्यावसायिक वाहनांची तपासणी करून त्यांना तंदुरुस्ती प्रमाणपत्र आरटीओ कार्यालयाकडून दिले जाते. आरटीओतील वाहन निरीक्षकांवर ही जबाबदारी असते. रिक्षा, टॅक्सी, ई-टॅक्सी, स्कूलबस, प्रवासी बस, मालमोटार आणि टेम्पो या वाहनांची ही तपासणी केली जाते. यात वाहनांच्या सुरक्षाविषयक निकषांची तपासणी होते. रस्त्यावर चालण्यासाठी ते वाहन सुरक्षित आहे का आणि ते प्रदूषण करणारे आहे का, हेही तपासले जाते. आता हे काम स्वयंचलित तपासणी आणि प्रमाणपत्र केंद्राच्या माध्यमातून होईल.एकूण २३ निकषांच्या आधारे ही तपासणी होईल. यामुळेच काटेकोर निकषांचे पालन करून वाहन तपासणी होईल आणि त्यातील मानवी हस्तेक्षप टाळला जाणार आहे.

हेही वाचा… तुम्ही बॅट पॅड घालून तयार… जितेंद्र आव्हाड यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत दिवे घाट येथे स्वयंचलित तपासणी व प्रमाणपत्र केंद्र सुरू होईल. सध्या राज्यात नाशिकमध्ये असे केंद्र आहे. वाहन निरीक्षकांऐवजी या केंद्राच्या माध्यमातून वाहनांची स्वयंचलित तपासणी होणार आहे. – संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे</strong>