मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत मुसळधार पाऊस कायम असून, पुढील पाच दिवसांत काही भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणात काही भागांत चोवीस तासांत ३०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. कोकणात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आणि ठाण्यातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आदी भागांत जोरदार पाऊस होत आहे. विदर्भातही गेल्या चोवीस तासांत काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण अद्यापही कमी आहे.

अरबी समुद्रातून सध्या महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर बाष्प येत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीचा भाग आणि त्यालगत थेट पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मोठ्या प्रमाणातवर ढग निर्माण होत असल्याने दोन ते तीन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण कोकणात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. त्यामुळे या भागात सर्वच नद्या धोक्याची पातळी ओलांडत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत होत असले, तरी काही भागांत तळ गाठलेल्या धरणांमध्ये पाणी जमा होऊ लागले आहे. त्याचप्रमाणे रखडलेल्या पेरण्या आता झपाट्याने मार्गी लागत आहेत.

pavana river become most polluted river in india
पवना नदी देशातील सर्वाधिक प्रदूषित; ‘हे’ आहे कारण
farmers deprived of help during congress government says pm narendra modi
काँग्रेसकाळात शेतकरी मदतीपासून वंचित; शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधानांची टीका
rain in Vidarbha
सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
crop damage in vidarbha marathwada and north maharashtra due to unseasonal rain hailstorm
अवकाळी, गारपिटीमुळे पिके आडवी; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात प्रचंड नुकसान

मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभागात आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या विभागात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. मराठवाड्यात सध्या पाऊस कमी असला, तरी काही ठिकाणी दोन दिवसांत पावसाचा जोर वाढेल. विदर्भातही पुढील चार ते पाच दिवसांच्या कालावधीत पावसाची शक्यता कायम आहे.

पाऊसमान…
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस होणार आहे.

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये पुढील तीन ते चार दिवस काही भागांत इतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे..
कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतही अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

पुणे, नाशिक आदी जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आदी भागांत ६,७ जुलैला पावसाची शक्यता आहे.

चोवीस तासांत ३४० मिलिमीटर पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे गेल्या चोवीस तासांत तब्बल ३४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तळा, माणगाव, वैभववाडी, मालवण, संगमेश्वर आदी ठिकाणी २१० ते २४० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. वेंगुर्ला, कल्याण, महाड, पालघर, अंबरनाथ, सावंतवाडी, ठाणे, उल्हासनगर, पनवेल आदी भागांत १५० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. उरण, दापोली, डहाणू, पेण, पाली आदी ठिकाणी १२० ते १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळपासून संध्याकाळी साडेपाचपर्यंत मुंबईतील सांताक्रुझ केंद्रावर १५३ मिलिमिटर पाऊस नोंदविला गेला. कोल्हापूर येथील गगनबावडा येथे चोवीस तासांत २५० मिलिमीटर पाऊस झाला. महाबळेश्वर, राधानगरी आदी भागांत १०० ते १४० मिलिमिटर पावसाची नोंद झाली.